Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 02:22 PM2020-04-06T14:22:03+5:302020-04-06T14:35:20+5:30

Coronavirus : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. 

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,74,022 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,64,833 लोक बरे झाले आहेत.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. 

कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे.

आरोग्य सेतू हे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-19 ट्रॅकिंग अ‍ॅप आहे. तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं.

जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येतं. त्यामुळे  हे अ‍ॅप गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोनाबाधित असल्यास युजर्सना सतर्क करणार आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे शासनाकडे नोंद असलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीजवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप ‘त्या’ व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. 

केंद्र सरकारकडे असलेल्या डेटाबेसचा अ‍ॅक्सेस या अ‍ॅपला मिळणार आहे. केंद्रातर्फे लिंकचे मॅसेज देण्यात येत असून या लिंकद्वारेही हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करता येतं.

आरोग्य सेतू अ‍ॅप युजर्सना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी संबंधित इतरही सल्ले देणार आहे.

कोरोनाच्या ट्रॅकिंग व्यतिरिक्त यामध्ये काही फीचर्सही देण्यात आले आहेत. कोरोनाची माहिती आणि संरक्षणाचे उपायही सांगण्यात आले आहेत. तसेच जवळच्या कोरोना हेल्पसेंटरबाबतही माहिती देण्यात आली आहे. 

आरोग्य सेतू अ‍ॅप हे 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली आणि तमिळ भाषांसोबत इतर भाषांचा समावेश आहे.

सध्या हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आपल्याला गुगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरमधून डाऊनलोड करता येणार आहे.

कोरोनाबाबत लोकांना सतर्क, जागृत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे.