CES 2019 : टेक्नॉलॉजीचा पंच...10 सेेकंदात दात घासा; ट्रेडमीलद्वारे वीजनिर्मिती करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 04:03 PM2019-01-11T16:03:54+5:302019-01-11T16:25:28+5:30

ग्लोबल सीईएस 2019 मध्ये उद्याचे जग कसे असेल यावर एक प्रकाशझोत टाकण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप आणि प्रतिथयश कंपन्यांनी लावलेले शोध आणि त्यांनी बनविलेली उपकरणे पाहून डोळ्यांचे पारणेच फिटले. चालणारी कार, लढाऊ विमानासारखी उडणारी कार यासोबतच चालकाने नियंत्रण गमावल्यावर स्वत:च ताबा घेणारी कार आणि बरेच काही, डोळे विस्फायरायला लावणारे शोध यामध्ये दाखविण्यात आले. असेच आणखी पाच शोध आहेत, जे आपली दैनंदिन जीवन बदलू शकतात.

झटक्यात दात घासा... रोज सकाळी उठून दात घासण्याचे काम स्वच्छतेचे जरी असले तरीही बऱ्याच जणांसाठी कंटाळवाने असते. आत त्यांचा हा कंटाळा दूर होणार आहे. फ्रान्सच्या कंपनीने असा एक टूथ ब्रश आणला आहे की, तो एका व्यक्तीचे दात केवळ 10 सेकंदात अगदी उत्तम प्रकारे घासणार आहे. वाय-ब्रश असे या ब्रशचे नाव असून दात पडल्यावर कवळ्या असतात अगदी तसा या ब्रशचा आकार आहे. या कवळीमध्ये दात घासण्यासाठी छोटे छोटे ब्रश आहेत.

प्राण्यांसाठी हाय टेक टॉयलेट... कुत्रा, मांजर सारखे प्राणी जरी आवडीचे असले तरीही त्यांना प्रातर्विधीसाठी बाहेर फिरावयास न्यावे लागते. यामुळे रस्ता किंवा उघड्यावर घाण होते. यापासून वाचण्यासाठी कुत्र्यांसाठी हायटेक टॉयलेट बनविण्य़ात आले आहे. इनुबॉक्स असे या उपकरणाचे नाव असून ते आपोआप स्वच्छ होण्याची सोय आहे. तसेच कुत्र्याचा मैला एका चेंबरमध्ये सुरक्षित ठेवला जातो. यामुळे दुर्गंधीही पसरत नाही.

ट्रेडमीलवर घाम गाळा अन् वीज निर्मितीही करा... नववर्षामध्ये व्यायाम करण्याची स्वप्ने आपण नेहमीच पाहतो. याची तयारीही ट्रेडमीलसह व्यायामाची अनेक उपकरणे खरेदी केली जातात. मात्र, 8-10 दिवस झाले की त्यावर धूळ बसायला लागते. आता तसे होणार नाही. नेहमीच्या कंटाळवाण्या ट्रेडमीलवर घाम गाळ्यापेक्षा ही हायटेक ट्रेडमील रोज तुम्हाला प्रोत्साहित करेल. अमेरिकेच्या स्पोर्ट्स आर्ट कंपनीने व्यायामाबरोबरच वीजही निर्माण करू शकाल अशी ट्रेडमील तयार केली आहे. Verde G690 असे या ट्रेडमीलचे नाव असून मोटरशिवाय ही ट्रेडमील वापरता येतेय मानवाच्या शक्तीपासून ही मशीन तासाला 200 वॅट वीज निर्माण करू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

सर्व उपकरणे करा वायरलेस चार्ज... फ्रान्सची स्टार्टअप कंपनी एनर्जीस्क्वेअर ने नुकताच मोबाईल, लॅपटॉसह सर्व उपकरणांसाठी वापरता येणारा युनिव्हर्सल वायरलेस चार्जर लाँच केला. या चार्जरचा रिसिव्हरचा भाग लॅपटॉपच्या तळाला चिकटवावा लागतो. तो कॉम्प्युटरच्या चार्जिंग पोर्टलाही जोडता येतो. यामुळे लॅपटॉप कंपनीच्या डेस्कवर चार्जिंग पॉईंट नसला तरीही कॉम्प्युटर असेल तिथे जोडता येतो.

मालवाहतूक-प्रवासी कार एकच... जर्मनीची आघाडीची आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीजने सेल्फ ड्रायव्हिंग कार प्रदर्शनात ठेवली होती. ही कार गरजेप्रमाणे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करू शकते. प्रवासी वाहतूक करायची असल्यास आसने (सीट) तयार होतात आणि जर मालवाहतूक करायची असल्यास ती आपोआप सीट फोल्ड करून रिकामी होते. या कारमधून एकावेळी 12 जण प्रवास करू शकतात.