सावधान! तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:25 AM2021-08-02T11:25:48+5:302021-08-02T11:33:35+5:30

त्वरित KYC करा, अन्यथा २४ तासांत सिमकार्ड बंद होईल, असा मेसेज तुम्हालाही आलाय का? Vi, Airtel चा अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून Vodafone-Idea आणि Airtel युझर्सच्या मोबाइलवर KYC अपडेट करावे, अन्यथा पुढील २४ तासांत तुमचे सिमकार्ड बंद होईल, असे मेसेज फिरत आहे. अशा प्रकारचा मेसेज तुम्हालाही आला असेल, तर चुकूनही त्या मेसेजला क्लिक करू नका.

अशा मेसेजला रिप्लायही अजिबात करू नका किंवा त्यातील मोबाइल नंबरवरही क्लिक करून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. कारण हा फ्रॉड मेसेज असून, क्षणार्धात तुमचा मोबाइल हॅक होऊ शकतो आणि बँक खाते रिकामे होऊ शकते.

Vi आणि Airtel या कंपन्यांनी ग्राहकांना यासंदर्भात अलर्ट पाठवला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहावे आणि अशा मेसेजवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन कंपन्यांकडून केले जात आहे.

देशभरात Vi च्या ग्राहकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करत आहेत. गुन्हेगार कंपनीचे कर्मचारी असल्याचा दावा करत यूजर्सचा खासगी डेटा चोरी करत आहे. सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) ग्राहकांना केवायसी संबधित SMS बाबत सावध केले आहे.

Vi च्या ग्राहकांना सातत्याने अनोळखी नंबरवरून एसएमएस आणि कॉल करतात. यात ग्राहकांना त्वरित केवायसी अपडेट करण्यास सांगतात. हे गुन्हेगार Vi चे कर्मचारी असल्याचे सांगतात व केवायसी न केल्यास ग्राहकांचे सिम ब्लॉक करण्याची धमकी देतात.

सायबर गुन्हेगार सातत्याने यूजर्सला कॉल आणि एसएमएस करत KYC व्हेरिफिकेशन करण्यास सांगतात. तसेच, केवायसीसाठी कागदपत्रं जमा करण्यास सांगितले जाते. यासाठी २४ तासच मुदत असल्याची भिती दाखवतात.

ग्राहकांना गुगल प्ले स्टोरवरून एक क्विक सपोर्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अशाप्रकारचे कोणतेच अ‍ॅप नसल्यामुळे ग्राहकांना TeamViewer क्विक सपोर्ट अ‍ॅपवर रिडायरेक्ट केले जाते. या अ‍ॅपद्वारे गुन्हेगारांना फोन आणि फोनशी संबंधित अकाउंट्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. यामुळे तुमच्या मोबाइल स्क्रिनवरील सर्व माहिती गुन्हेगारांना दिसते व ते ऑनलाइन बँकिंग पासवर्डचा स्क्रीनशॉट काढतात.

सायबर गुन्हेगारांकडून पाठवण्यात आलेल्या या प्रकारच्या मेसेजचा उद्देश यूजर्सकडून ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पत्ता, आधार कार्डची माहिती आणि फोटो इत्यादी मिळवणे हा असतो. ऑनलाइन बॅकिंगची माहिती, सोशल मीडिया पासवर्ड इत्यादी जमा करून पर्सनलाइज फिशिंग मेसेज तयार केला जातो. अशा माहितीमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

जर तुम्हाला अशा प्रकारचा कॉल अथवा मेसेज आल्यास त्याला उत्तर देऊ नका. तसेच, तुमची कोणतीही खासगी माहिती देखील शेअर करणे टाळा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर कंपनीच्या अधिकृत स्टोरवर जाऊ शकता.

याशिवाय, अधिकृत कस्टमर केअर नंबरवर देखील फोन करू शकता. मेसेजमध्ये आलेल्या अनोळखी लिंकवर देखील क्लिक करणे टाळा. तुम्ही दिलेल्या खासगी माहितीमुळे काही मिनिटातच तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहणे गरजेचे आहे.