"भारतीय रामाने चीनच्या ड्रॅगनवर साधला निशाणा", सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:03 PM2020-06-18T13:03:26+5:302020-06-18T13:16:22+5:30

लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव वाढला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तैवानमध्ये सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये भगवान रामाने चिनी ड्रॅगनवर निशाणा साधल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच, या फोटोवर ‘वी काँकर, वी कील’ म्हणजेच आम्ही विजय मिळवू आणि ठार करु (शत्रूला) असे लिहिण्यात आले आहे.

तैवान न्यूज नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला ‘फोटो ऑफ द डे’ अशीही कॅप्शन देण्यात आली आहे. भारताच्या रामाने चीनच्या ड्रॅगनवर हल्ला केला, असे तैवान न्यूजने लिहिले आहे.

तैवानमध्ये हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर भारतामध्येही सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहे. या पोस्टवर भगवान रामाने चिनी ड्रॅगनवर धनुष्यबाण रोखल्याचे दिसत आहे.

भारतामध्ये दसऱ्याला अशाप्रकारचे फोटो व्हायरल होताना दिसतात. यामध्ये भगवान राम रावणाचा वध करताना दाखवण्यात येते. भारतामध्ये वाईटाने चांगल्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो.

तैवानमध्ये चीनविरोधात प्रचंड राग आहे. तैवानविरोधातही चीनने अनेकदा कुरापती केल्या आहेत. मात्र, तैवान चीनच्या दबाला जास्त महत्व देत नाही.

चीन आपल्या आजूबाजूच्या लहान मोठ्या देशांच्या भूभागांवर आपला अधिकार असल्याचे दाखवतो आणि तो बळकावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तैवान सुद्धा चीनला विरोध करतो.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.

चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.

या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.