पठ्ठ्यानं नशीब काढलंय! एकाच मंडपात दोन्ही प्रेयसींसोबत केलं लग्न; अख्ख गाव म्हणतंय नादखुळा

By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 03:55 PM2021-01-07T15:55:01+5:302021-01-07T15:59:07+5:30

लग्न म्हटलं की दोन कुटुंबाचं बंधन, मुलगा किंवा मुलगी वयात आली की घरच्या मंडळींकडून लग्नासाठी मुली किंवा मुलगा बघण्याचा कार्यक्रम सुरू होतो. एक लग्न जुळवताना अनेकांची तारांबळ उडते, मुला-मुलींनी एकमेकांना पसंत केले तर लग्नाचा बार उडवला जातो.

वधू-वरांना एकत्र आणण्यासाठी आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो, घरच्यांची पसंती, दोन्ही जोडप्यांची एकमेकांना पसंती झाली तर लग्न जुळतं, पण तुम्ही असं कधी पाहिलंय की एकाच लग्नात एकटा नवरदेव दोन नवरी मुलींची लग्न करतोय?

नाही, ना अहो हे प्रत्यक्षात घडलंय. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात अजब प्रेमाची गजब कहाणी सगळ्यांनाच पाहायला मिळाली आहे आणि ती गोष्ट ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. याठिकाणी एका वराने चक्क एकाच मंडपात दोन वधुंची लग्न करून विवाहाच्या पवित्र बंधनात अडकला आहे.

मुलगा दोन मुलींवर प्रेम करत होता आणि दोघींपैकी कोणालाही सोडणं त्याला जमत नव्हते किंबहुना त्याची इच्छाही नव्हती. अशा परिस्थितीत त्याने जो निर्णय घेतला त्याचं आश्चर्य सर्वजण व्यक्त करत आहेत. या अजब लग्नाची चर्चा सध्या बस्तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील टिकरालोहंगा येथे एक तरुण राहतो. तो दोन मुलींवर प्रेम करायचा आणि त्यापैकी एकीलाही सोडण्याची त्याची इच्छा नव्हती. अशा परिस्थितीत त्याने दोघांचीही एकत्र लग्न केले.

यासाठी या युवकाने लग्नाच्या आमंत्रण पत्रात दोन्ही मुलींची नावे छापली. आश्चर्य म्हणजे या तिघांच्या कुटुंबीयांनीही या लग्नास सहमती दर्शविली. टिकरालोहंगा येथे राहणारा चंदू मौर्य करंजी येथे राहणारी हसीना बघेल आणि एरंडवालच्या सुंदरी कश्यप यांच्या प्रेमात पडला होता.

या प्रेमप्रकरणात सुंदरी आणि हसीना यांना एकमेकांबद्दलही माहिती होती. तिघांनाही प्रेमाची नशा इतकी चढली होती की, त्यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढत गेले, यातच सुंदरी गर्भवती झाली. सुंदरी गर्भवती झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी लग्नासाठी तिच्यावर दबाव वाढवला.

त्यावेळी चंदूने दोन्ही प्रेमिकांसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीर केली. यावर कुटुंबाने आक्षेप घेतला, परंतु बरचं समजवल्यानंतर तिन्ही कुटुंबांनी या लग्नास सहमती दर्शविली आणि लग्न टिकरालोहंगामध्येच आयोजित करण्यात आले होते.

लोक म्हणतात की, चंदूने दोन्ही मुलींसोबत एकाच मंडपात सात फेरे घेतले. यानंतर गावात एक रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं, ज्यात दोन्ही नववधू आणि वरांना बसण्याची व्यवस्था केली होती.

या दरम्यान लोकांनी तिघांनाही लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. तथापि, या अजब प्रेमाचं गजब लग्न सर्वांसाठी चर्चेचा विषय बनलं आणि गावभर आठवणीत राहणारी घटना घडली.

टॅग्स :लग्नmarriage