सिंधुदुर्गात कोसळधार; कणकवली, कुडाळ अन् वेंगुर्ल्यात पावसाचा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:13 PM2019-08-06T16:13:01+5:302019-08-06T16:31:30+5:30

सिंधुदुर्गात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. खारेपाटण, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे.

कुडाळ तालुक्यातील शिवापूर, वसोली, आंजीवडे, उपवडे या आठ गावांचा संपर्क तुटला आहे. कोकणातल्या अनेक रस्त्यांवर पावसानं वाहतुकीची कोंडी झाली आहे.

तर बऱ्याच ठिकाण रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी विजतारा तुटल्या असून, गावागावात विजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच मोबाईल टॉवर बंद झाल्यानं कम्युनिकेशन यंत्रणाही कोलमडली आहे.

गेले चार दिवस उसंत न घेता पाऊस धुवांधार बरसत आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रहदारीच्या वाहतुकीच्या मार्गांवर पाणी आल्यानं अनेक ठिकाणच्या बस फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.

आचरा मार्ग, कुंभवडे, असरोंडी, बिडवाडी, भरणी या गावांना जाणारे मार्ग पाण्यानं वेढले आहेत.

खारेपाटण बाजारपेठेत पावसाचं पाणी घुसले आहे. कणकवली शहरात काही सखल भागातही पाणी साचलं आहे. गडनदी, जानवली, सुखनदी, शिवगंगा नद्यांनी पूर रेषा ओलांडली आहे.