आंबोली हाऊसफुल्ल! परिसर नटला हिरवाईने, पर्यटकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:52 PM2019-07-08T13:52:42+5:302019-07-08T14:07:57+5:30

पांढऱ्या मोत्यांचा हार झाला... हिरव्या शालूवर उठून दिसला... गार वारा सुसाट धावू लागला...धबधबा जोराने कोसळू लागला. बिपीन जगताप यांच्या या काव्यपंक्तींप्रमाणे आंबोली घाटातील मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून परिसर हिरवाईने नटला आहे.

घाटातील धबधब्यांसोबतच कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी, महादेवगड, नांगरतास धबधबा आदी ठिकाणीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा पाऊस लांबल्याने आंबोलीतील धबधबे व पावसाचा आनंद लुटायला येणा-या पर्यटकांना बरीच प्रतीक्षा करावी लागली.

मात्र, सुमारे चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोलीतील धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागले. त्यामुळे पर्यटकांनी गेल्या शनिवारी सकाळपासूनच आंबोलीची वाट धरली. पर्यटकांच्या गर्दीमुळे आंबोली परिसर फुलून गेला होता.

गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात विशेषत: शनिवार-रविवारी आंबोली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे.

तसेच, घाटरस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी चारचाकी व मोठी वाहने आंबोली बाजार परिसरातच पार्क करण्याची सक्ती करण्यात आली आहे. (सर्व फोटो - महेश कर्पे)