पालकांनो लक्ष द्या! तुमच्या या सवयींमुळे मुलांचं भविष्य येऊ शकतं धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 07:26 PM2019-01-02T19:26:35+5:302019-01-02T19:33:26+5:30

1. पालकांच्या या सवयी मुलांसाठी ठरतील घातक : लहान मुलांवर त्यांच्या पालकांचा सर्वाधिक प्रभाव असतो. पालकांना पाहूनच लहान मुलं बऱ्याच गोष्टी शिकतात. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याचाच विचार करतात. पण अनेकदा त्यांच्या वागणुकीमुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होण्याचीही शक्यता असते. यामुळे भविष्यात मुलांना कित्येक समस्यांचाही सामना करावा लागतो. आपल्या मुलांसोबत अशा कोणत्याही गोष्टी घडू नये, यासाठी काही चुका करणं पालकांनी कटाक्षानं टाळलं पाहिजे.

2. अपेक्षा लादणं - आपल्या मुलांकडून पालकांनी अपेक्षा ठेवणं, ही बाब तसे पाहायला गेलं तर स्वाभाविक आहे. पण कोवळ्या वयातच त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादणे आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याची आशा बाळगणं, ही बाब चुकीची आहे. तुमची आवड आणि मुलांची आवड, यामध्ये अंतर असू शकते. त्यामुळे मुलांच्या इच्छा-आकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यास प्रोत्साहन द्या.

3. ओव्हर पजेसिव्हनेस - आपल्या मुलांप्रती पालक नेहमीच पजेसिव्ह असतात. मात्र पालकांमध्ये ही भावना गरजेपेक्षाही अधिक असणं मुलांच्या दृष्टीनं चांगली नाही. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन मुलांकडे वारंवार चौकशी करणं, त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतील. या सवयीमुळे मुलं मोठी झाल्यावर कदाचित तुमच्यापासून दुरावलीदेखील जातील.

4. तुलना करणं - इतरांसोबत तुलना केल्यास लहान मुलांमधील आत्मविश्वासावर परिणाम होतो. दुसऱ्या मुलांनी चांगले गुण आणल्यास, एखादी स्पर्धा जिंकल्यास,इत्यादी गोष्टींमध्ये आपल्या मुलांची तुलना होऊ देऊ नका. यामुळे तुमच्या मुलामधील आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो.

5. गरजेपेक्षा अधिक शिस्त - शिस्त लावणे गरजेचं आहे पण याचा अतिरेक होता कामा नये. प्रत्येक वेळेस मुलांना ओरडणे, शिक्षा देणे आवश्यक नाही. त्यांच्याकडून चुका होऊ नये, यासाठी चांगले आणि वाईट यातला फरक त्यांना समजावून सांगणे गरजे आहे. अनेक गोष्टी प्रेमानेही सांगता येऊ शकतात. यामुळे मुलांच्या मनामध्ये पालकांप्रती भीतीही राहणार नाही.

6. वेळ ने देणे - धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं एक टास्क आहे. पण जर घरात लहान मुल असेल तर सर्व गोष्टींचे नियोजन करुन आपला दिनक्रम ठरवावा. जेणेकरुन आपल्या मुलांना क्वालिटी टाईम देता येईल. मुलांच्या आयुष्यात तुमची गैरहजेरी कदाचित पालक-मुले या नात्यात दुरावा निर्माण करेल.

7. विश्वास न ठेवणे - आपल्या चुका लपवण्यासाठी लहान मुलं बऱ्याचदा खोटं बोलतात. यामुळे आपल्या मुलांवर नेहमीच अविश्वास दाखवणं, चुकीची बाब आहे. मुलं जे काही सांगतील, ते आधी नीट ऐका, त्यानंतर सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या सांगण्यातून तुम्हाला सत्य परिस्थिची माहिती मिळेल. शिवाय, आपल्या लहान मुलाला खोटं का बोलावं लागलं, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे कदाचित तुमच्या मनातील शंका दूर होतील.