मुलांना स्मार्ट बनवायचंय? मग या गोष्टींची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 04:50 PM2019-03-03T16:50:38+5:302019-03-03T17:06:19+5:30

मुलांना समजून घेणं आणि त्यांना समजावणं फार कठीण काम असतं. चिमुकल्यांच्या मनात कधी काय येईल आणि कधी ते कोणत्या गोष्टीचा हट्ट धरतील याचा काही नेम नाही. पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांना स्मार्ट आणि इंटेलिजेंट करण्यासाठी पालक नेहमीच तत्पर असतात.

आई-वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असल्याने बऱ्याचदा मुलांशी संवाद साधता येत नाही मात्र तुमच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून मुलांसाठी थोडा वेळ नक्की काढा. मुलांशी संवाद साधनं हे अत्यंत गरजेचं आहे. मुलांशी मनमोकळेपणाने गप्पा मारा म्हणजे तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. मुलांशी हिंदी, इंग्रजीभाषेसोबतच आपल्या मातृभाषेत संवाद साधा.

लहान मुलं खूप हुशार असल्याने अनेक गोष्टींचं निरीक्षण करत असतात. घरामध्ये नकारात्मक अथवा हिंसक गोष्टी ठेवू नका. सकारात्मक वातावरण हे मुलांच्या वाढीसाठी पोषक असतं. मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा. तसेच विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या.

लहान मुलांना खेळण्यासाठी बाजारात विविध प्रकारची आकर्षक खेळणी उपलब्ध आहेत. मात्र मुलांसाठी खेळणी खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल तसेत त्यांना खेळताना चांगलं शिकायला मिळेल ही गोष्ट लक्षात घेऊन खेळण्यांची खरेदी करा.

लहान मुलांना चॉकलेट, स्नॅक्ससारख्या अनेक गोष्टी प्रचंड आवडतात मात्र याच वयोगटात त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यांच्या शरिराला पोषक असलेला सकस आहार त्यांना द्या. मुलाच्या आहारावर त्यांचा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि बौद्धिक विकासही अवलंबून असतो.

अति संवेदनशील मुलं बऱ्याचदा सोशल फोबियाची शिकार होतात. त्यामुळे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. दुसऱ्या मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन येऊ शकतं. त्यांना नवीन लोकांसोबत ओळख करून द्या. त्यांना घराबाहेर घेवून जात असाल तर त्यासाठी त्यांना मानसिकरित्या तयार करा.

लहान मुलांचा घरामध्येही थोडा अभ्यास घ्या. puzzle game खेळताना मुलांना मदत करा. विविध रंगाची, फुलांची, फळांची, प्राण्यांची त्यांना माहिती द्या. केवळ खासगी शिकवणीवर अवलंबून न राहता त्यांचा घरीदेखील अभ्यास घ्या म्हणजे मुलं हुशार होतील.

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोनचं लहान मुलांनाही वेड लागलं आहे. दिवसातून अर्धातास अथवा एक तास मुलं स्मार्टफोनचा वापर करत असतील तर ठीक आहे. लहान मुलांना स्मार्टफोन आणि व्हिडीओ गेमपासून लांब ठेवा. सततच्या स्मार्टफोनच्या वापरामुळे त्यांच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची इतर खेळणी द्यावीत.