Serum Institute Story: रेसच्या घोड्यांना तयार करण्याची 'फॅक्टरी' ते सीरम इन्स्टीट्यूट; 100 कोटी डोस अशक्यप्राय होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:31 PM2021-10-21T15:31:22+5:302021-10-21T15:49:27+5:30

Serum Institute play big role in Corona Vaccination: 2001 मध्ये सीरम 35 देशांना लस पुरवत होती, आता सीरम 165 देशांना लस पुरविते. सीरमने एकट्याने 88 टक्के कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत.

2019 मध्ये जगाला आपल्या कवेत घेण्याऱ्या कोरोना व्हायरसचा (Corona Virus) जन्म झाला. 2020 च्या सुरुवातीला बघता बघता या व्हायरसने जगात पसरण्यास सुरुवात केली. माणसे पटपट मृत्युमुखी पडू लागली. चीनवर सारे बालट आले. मोठमोठे लॉकडाऊन लावण्यात आले. कोरोनाला रोखण्यासाठी एवढे पुरेसे नव्हते. कोरोना लसीची आवश्यकता होती.

भारतासह चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटनसारखे देश कोरोना लस शोधू लागले. अनेक देशांना ही संधी होती, मोठे बनण्याची. भारताच्या कोव्हॅक्सिनच्या चाचण्या होऊ लागल्या. त्याआधी ब्रिटनच्या अॅस्ट्राझिनेकाने लस शोधली होती. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटशिवाय (Serum Institute) ही लस एवढ्या मोठ्य़ा प्रमाणावर बनविणे आणि त्याच्या ट्रायल घेणे शक्य नव्हते.

सीरम इनस्टीट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी होती. साऱ्या जगाच्या आशा याच कंपनीवर होत्या. कोव्हिशिल्डवर काम सुरु झाले. चाचण्या सुरु झाल्या आणि त्यातून यश मिळविलेली लस लोकांना देण्याचा निर्णय झाला. भारताची लोकसंख्या मोठी होती, सोबत ब्रिटनसोबत आणि जगातील मोठ्या संस्थांसोबत करार केले होते. जगालाही लस पुरवायची होती.

सीरमने ती जबाबदारी पार पाडली, भारतातही आज 100 कोटी लसींचे डोस देण्यात आले. हे उद्दीष्ट्य पार करण्यात भारत बायोटेक, सीरम या दोन कंपन्यांचा मोठा वाटा आहे. अदार पूनावाला यांच्या ब्रिटनमध्ये फेऱ्या वाढल्या. सीरम नसती तर भारताला हे लक्ष्य गाठणे महाकठीण गेले असते. चला जाणून घेऊया या कंपनीच्या उगमाबद्दल.

ब्रिटिशांच्या काळात 19 व्या शतकात पुनावाला (Poonawala) कुटुंब पुण्यात आले होते. याच काळात पारसी परिवार भारतात स्थलांतर करत होते. प्रशासन ते व्यवसायांमध्ये त्या लोकांनी जम बसविला. एवढेच नाही, ज्या शहरांमध्ये ते राहिले त्या शहरांची नावे त्यांच्या आडनावात पाहिली जातात. यामुळे अदार पुनावाला यांचे आडनावही पुण्यावरून पडले.

स्वातंत्र्या आधी पुनावाला कुटुंब हे कंट्रक्शन व्यवसायात होते. मात्र, त्यांना घोड्यांच्या व्यवसायावरून ओळखले जात होते. सोली पूनावाला यांनी घोड्यांचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे प्रशिक्षित झालेले घोडे हे रेसिंगसाठी वापरले जायचे. याचा फायदा असा झाला की, पुनावालांची ओळख मोठमोठ्या उद्योजकांशी झाली.

यावेळी त्यांनी उद्योग वाढविण्याचे ठरविले. तेव्हा त्यांच्या लस बनविण्याचे लक्षात आले, तेव्हा सरकारच्या नियंत्रणात लस बनविली जात होती. यामुळे संधी कमी असली तरी जोखीम देखील होती. हा विचार सायरस पुनावालांच्या (cyrus poonawalla) मनात आला होता.

याचे मुख्य कारण म्हणजे, मुंबईतील हाफकिनमध्ये पुनावालांच्या फर्मचे म्हातारे झालेले घोडे दिले जात होते. या घोड्यांपासून सर्पदंश आणि टिटनेसची लस बनविली जात होती. जेव्हा सायरस यांना हे समजले तेव्हा त्यांनी या घोड्यांचा वापर स्वत:च करण्याचा विचार केला आणि 1966 मध्ये सीरम इन्स्टीट्यूटची स्थापना झाली.

यानंतर सीरमने अनेक आजारांवर लस बनविण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलन मोहीम सुरु झाली आणि सीरमला मोठे व्यासपीठ मिळाले. सायरस यांनी अमेरिका आणि युरोपमधून तंत्रज्ञान आणून आपले उत्पादन वाढविले. तसेच त्याचे दरही कमी ठेवले. सीरमची सुरुवात त्यांनी 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून केली होती. आज सायरस हे जगातील 165 वे आणि भारतातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

2012 मध्ये सीरमने डच सरकारी लस निर्माता कंपनीला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी लस निर्माचा कंपनी बनली. 2001 मध्ये सीरम 35 देशांना लस पुरवत होती, आता सीरम 165 देशांना लस पुरविते. सीरमने एकट्याने 88 टक्के कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत.