ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 08:42 PM2018-04-02T20:42:52+5:302018-04-02T20:44:47+5:30

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे सोमवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांची अखेर आज प्राणज्योत मालवली.

भाई वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवड्यांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता.

स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी मंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते. शालेय जीवनातच 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला.

गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते.

पुलोदच्या सरकार मध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून दीड वर्षे पदभार सांभाळला होता. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, महागाई यासारख्या विविध सामाजिक प्रश्‍नांना आंदोलनाद्वारे त्यांनी वाचा फोडली होती.