West Bengal Assembly Elections: 14 मार्च 2007, पोलीस फायरिंगमध्ये 14 ठार; ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये पुन्हा खेळला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 10:54 AM2021-03-30T10:54:54+5:302021-03-30T11:02:12+5:30

West Bengal Assembly Elections: नंदीग्राममध्ये पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. ममता यांनी त्याच्या आधीच 2007 मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगचा उल्लेख केला आहे. ममता यांनी यामध्ये थेट अधिकारी पिता-पुत्रावर टीका केली आहे

कोलकाता : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या बंगालला मिनी पाकिस्तान बनवतील असा गंभीर आरोप त्यांचा पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेले बडे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना धडा शिकविण्यासाठी ममता त्यांच्याविरोधात नंदीग्राममधून लढत आहेत. आता ममता यांनी जवळपास 14 वर्षे जुन्या घटनेचा डाव खेळला आहे.

नंदग्राममध्ये पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. ममता यांनी त्याच्या आधीच 2007 मध्ये झालेल्या पोलीस फायरिंगचा उल्लेख केला आहे. ममता यांनी यामध्ये थेट अधिकारी पिता-पुत्रावर टीका केली आहे. शेतजमिनीच्या अधिग्रहनाविरोधातील ऐतिहासिक आंदोलनावेळी 14 मार्च 2007 ला पिता-पुत्राला माहिती न देता पोलीस नंदीग्राममध्ये येऊच शकत नव्हते, असा आरोप केला आहे. (14 March 2007 Nandigram police firing on Farmer protesters.)

ममता यांनी अधिकारी यांच्यावर थेट आरोप करत या फायरिंगमध्ये बाप-बेट्याचा हात होता. या फायरिंगमध्ये 14 लोकांचा बळी घेतला गेला, असे रविवारी झालेल्या सभेत म्हटले.

ममता यांनी अधिकारी घराण्यातील कोणाचेही नाव घेतले नाही. बाहेरच्या गुंडांना बोलावून आमच्यावर हल्ला केला गेला. यामध्ये नंदीग्रामचा कोणीही नव्हता, असा आरोप ममतांनी लावला आहे.

हे तेच नंदीग्राम आहे, ज्या शेतकरी आंदोलनाद्वारे ममता बॅनर्जी आज राज्याच्या नेत्या बनल्या आहेत. यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर ममता यांनी नंदीग्रामच्या फायरिंगचा उल्लेख केला.

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामयेथून शेतजमिन अधिग्रहण करण्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. जानेवारी 2007 मध्ये सीपीएमचे आंदोलक आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर 14 मार्च 2007 या दिवशी नंदीग्राममध्ये 14 लोकांचा पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाला.

बंगालमध्ये तेव्हा बुद्धदेव भट्टाचार्य यांचे सरकार होते. त्यांनी हे आंदोलन चिरडण्यासाठी जवळपास अडीज हजार पोलिसांना नंदीग्रामला पाठविले होते. एकाबाजुला सशस्त्र पोलीस आणि दुसरीकडे आंदोलक उभे ठाकले होते. पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर डाव्यांच्या सरकारला औद्योगिकरणाच्या अजेंड्यावरून मागे हटावे लागले. यामुळे नंदीग्रामचा महत्वाकांक्षी प्रकल्प रद्द करावा लागला.

या आंदोलनाने ममता यांना मोठा जनाधार मिळाला. यामुळे पुढच्या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाला जोरदार मुसंडी मारता आली आणि ममता मुख्यमंत्री झाल्या.

14 लोकांचा मृत्यूने सरकार एवढे बिथरले होते की कोलकाता उच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. ममता यांनी य़ाच जखमेवरची खपली काढली आहे. कारण बंगालचे सत्तेचे राजकारण नंदीग्राम ठरविणार आहे.