साहेबांसाठी काय पण! मंत्र्याच्या प्रचारासाठी समर्थकाने डोळ्यांवर कापड बांधून चालवली स्कूटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 09:06 AM2021-03-29T09:06:22+5:302021-03-29T09:12:52+5:30

Tamil Nadu Assembly Election 2021 : मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते वाटेल ते करण्यासाठी तयार होत आहेत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही.

सध्या देशात कोरोनाचा कहर वाढत असला तरी पाच राज्यांमधील निवडणुकांसाठीचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. त्यात मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते वाटेल ते करण्यासाठी तयार होत आहेत. त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचाही त्यांच्याकडून विचार केला जात नाही.

दरम्यानच असाच एक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. येथे मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून तऱ्हेतऱ्हेचे हातखंडे आजमावले जात आहेत. चेन्नईमध्ये तर एआयएडीएमके पक्षाचे उमेदवार आणि राज्य सरकारमधील मंत्री एस. पी. वेलुमणी यांच्या एका समर्थकाने मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तोंडावर काळा कपडा बांधून अनेक किलोमीटरपर्यंत स्कूटी चालवली. यावेळी या समर्थकाच्या डोळ्यांसह संपूर्ण चेहरा हा काळ्या कपड्याने झाकलेला होता. डोळ्यांवर ही पट्टी काहीही दिसू नये अशा पद्धतीने बांधलेली होती.

वेलुमणी यांचे समर्थक यूएमटी राजा यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके सरकारने केलेल्या कामांबाबत मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी डोळ्यांवर पट्टीबांधून मी स्कूटी चालवली. वेलुमणी यांचे समर्थक असलेल्या राजांच्या म्हणण्यानुसार वेलुमणी यांनी मंत्री असताना किती काम केले हे दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे.

राजा पुढे म्हणतात की, दहा वर्षांपूर्वी रस्त्यावरून डोळे झाकून चालणेसुद्धा कठीण होते. मात्र एआयएडीएमके सरकारने जे सुशासन, चांगले रस्ते आणि उत्तम बांधकाम केले आहे. त्यामुळे डोळ्यांवर पट्टी बांधूनही वाहन चालवले जाऊ शकते.

मतदारांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी मी डोळ्यांवर पट्टी बांधून स्कूटी चालवण्याचा पर्याय निवडला. आता मतदार वेलुमणी यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून देतील.

यावेळी तामिळनाडूमध्ये उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. कुणी ढोसा बनवत आहे. तर कुणी मतदारांचे कपडे धूत आहे. तर कुणी रस्त्यावर सिंबलम मार्शल आर्टचे प्रदर्शन करत आहे, त्यामुळे प्रचारासोबतच मतदारांचे मनोरंजनही होत आहे.