Pandharpur Election Result: “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची गरज; अजित पवारांना जो गर्व झाला होता तो मोडून काढला”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:06 PM2021-05-02T19:06:25+5:302021-05-02T19:15:38+5:30

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही निवडणूक भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. कोरोना काळात झालेल्या या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनी जोरदार प्रचार केला होता.

पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला आहे. या निवडणुकीत भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंचे चिरंजीव भगिरश भालकेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही या निवडणुकीत भगिरथ भालकेंचा प्रचार केला

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी महाविकास आघाडीच्या भगिरथ भालकेंचा पराभव केला आहे. भगिरथ भालकेंचा पराभव महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे तर भाजपासाठी आनंद देणारा ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत जुगलबंदी रंगली आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. यानिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी अजित पवार सोलापुरात ठाण मांडून होते. इतकचं नाही तर अनेक स्थानिक नेत्यांच्या घरी जात त्यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती.

यावरून आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईत बसून योग्य नियोजन करत होते. पंढरपूर मंगळवेढ्यात महाविकास आघाडीचा गर्व फोडला. ५०-६० हजार मताधिक्यांनी राष्ट्रवादी उमेदवार विजयी होईल असा दावा करण्यात आला होता.

परंतु पंढरपूरच्या मतदारांनी त्यांना दाखवून दिलं. अजित पवारांना गर्व झाला होता तो मोडून काढला आहे. त्यांची टगेगिरीची भाषा होती असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.

याचसोबत भाजपाची विजयी घोडदौड कायम राहील. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची गरज आहे. महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम पंढरपूरच्या जनतेने केला आहे असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून भाजपाचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरूवातीच्या काही कलानंतर आवताडे पिछाडीवर जातील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता. परंतु शेवटपर्यंत आवताडे यांनी आघाडी वाढतच गेली.

अखेर ३८ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला गेला. या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ७ हजार ७७४ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंना १ लाख ४ हजार २७१ मते मिळाली.

याठिकाणी अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांना २ हजार ९३० मते मिळाली. त्याचसोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ हजार १८७ मतांवर समाधान मानावं लागलं. समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे ५ वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.