शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:33 PM2020-09-10T12:33:42+5:302020-09-10T12:54:38+5:30

शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर एका दरारा असलेला बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा सगळ्यांनाच आठवतो. शिवसेना गेली अनेक वर्ष महापालिकेत सत्ता आहे. १९९५ नंतर आज पुन्हा एकदा राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. कंगना राणौतच्या निमित्ताने शिवसेना आणि बॉलिवूड यांच्या नात्यावर पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे.

कंगना राणौतसोबतच शिवसेनेचा पंगा आहे असं नाही. तर यापूर्वीही कंगनाशिवाय बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांना शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा शिवसैनिकांसाठी अंतिम आदेश असायचा म्हणून सहसा शिवसेनेसोबत कोणी पंगा घेत नसे.

२०१० च्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केल्याप्रकरणी शिवसेना शाहरुख खानवर भडकली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाहरुख खानला तुझं घर मुंबईत आहे, पाकिस्तानात नाही, शाहरुख मुंबईला आल्यावर धडा शिकवू असा इशाराच दिला होता.

कंगनासोबत शिवसेनेचा वाद पहिल्यांदाच आहे असं नाही. कंगणाचा सिनेमा मणिकर्णिका आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपटावर आधारिता ठाकरे सिनेमा हा एकाच दिवशी रिलीज झाला. खरतरं शिवसेनेने त्यादिवशी कोणता दुसरा सिनेमा प्रदर्शित होणार नाही असं सांगितले होते. अनेकांनी सिनेमांच्या रिलीज डेट बदलल्या होत्या. पण कंगनाने मणिकर्णिका सिनेमा त्याच दिवशी रिलीज केला.

सलमान खानचा सिनेमा भाईजानच्या शुटींगवेळी पाकिस्तानी कलाकारांचा कडाडून विरोध झाला. त्यावेळी सलमान खान यांनी दहशतवादी आणि कलाकारांमध्ये फरत आहे असं सांगितले होते. सलमान खानचं हे विधान शिवसेनेला पटलं नाही. त्यांनी सलमानविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली. सलमानच्या वडिलांनी नंतर हे प्रकरण थंड केले.

४ वर्षापूर्वी कॉमेडियन कपिल शर्मा याने मुंबई महापालिकेविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. त्यावेळी शिवसेनेने कपिल शर्माविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट त्याच्या बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचं नाव आल्यानंतर संजय दत्तच्या डोक्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवला. तत्कालीन काँग्रेस खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांनी मातोश्रीवर धाव घेत बाळासाहेबांकडे मदतीची विनंती केली होती. बाळासाहेबांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याच्याविरोधात कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती हा दरारा शिवसेनेचा होता.

शिवसेनेने एकदा आपली भूमिका घेतली तर त्याच मार्गावर शिवसेना चालते. या मार्गाच्या मध्ये कोणीची आडवं आला विरोध केला तर शिवसेना कदापि ते सहन करत नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे. अगदी रजनीकांतपासून कपूर, खान खानदानापर्यंत बाळासाहेबांची सगळ्यांसोबत मैत्री होती. परंतु बाळासाहेबांनी भूमिका घेतली तर तिच्या आड येणारा कोणीही त्याची तमा शिवसेना बाळगत नसे.

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि शिवसेना यांच्यातील संबंधही चांगले आहेत. कुली सिनेमावेळी जर शिवसेनेची रुग्णवाहिका आली नसती तर मी वाचलो नसतो असं अमिताभ नेहमी सांगतात, बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्री होती. अनेक हिंदी, मराठी पुरस्कार सोहळ्यालाही बाळासाहेब हजेरी लावत असे.

बोफोर्स कांडमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्यानंतर अमिताभच्या शहंशाह सिनेमाला रिलीज न करण्यासाठी धमकी येऊ लागली. तेव्हा अमिताभने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे मदत मागितली. तेव्हा शिवसेनेचं संरक्षण अमिताभला भेटले. त्यामुळे अमिताभसाठी शिवसेना संकटमोचक म्हणून मदतीसाठी पुढे आली.