जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन

By admin | Published: January 7, 2016 12:00 AM2016-01-07T00:00:00+5:302016-01-07T00:00:00+5:30

जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचं ७ जानेवारी २०१६ रोजी सकाळी आठ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं.

२ नोव्हेंबर २००२ रोजी मुफ्तींनी पहिल्यांदाच जम्मू व काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. १९३६ मध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा येथे जन्म झालेल्या मुफ्तींनी श्रीनगरमधून कायद्याची पदवी घेतली तर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून अरबांच्या इतिहासावर त्यांनी परव्युत्तर शिक्षण घेतलं.

गेले काही महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे हालचालीवर मर्यादा आलेल्या मुफ्तींनी मुलगी मेहबुबा मुफ्तींनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांच्या भेटी व अन्य महत्त्वाची कामं मेहबुबाच करत असल्याचंही त्यांनी सूचीत केलं होतं.

पन्नासच्या दशकात डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य झालेल्या मुफ्तींनी गुलाम मोहम्मद सादिक यांच्या नेतृत्वाखाली खूप काळ काम केलं. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मुफ्तींनी जम्मू व काश्मिरमध्ये काँग्रेस रुजवली. राजीव गांधींच्या काळात मुफ्ती देशाचे पर्यटनमंत्री झाले.

१९८७ मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद व्ही. पी. सिंग यांच्या सरकारात सहभागी झाले. सिंग सरकारमध्ये असताना मुफ्ती देशाचे पहिले मुस्लीम गृहमंत्री झाले. २ डिसेंबर १९८९ मध्ये दहशतवाद्यांनी त्यांची मुलगी रुबय्या हिचे अपहरण केले आणि प्रचंड गदारोळ झाला. व्ही. पी. सिंग सरकारने दहशतवाद्यांशी तडजोड केली आणि रुबय्याची सुटका केली.

मुफ्तींचा केंद्रीय गृहमंत्रीपदाचा काळ वादळी ठरला. याच कालखंडात. म्हणजे १९९०च्या सुमारास काश्मिरमध्ये आतंकवाद्यांनी उच्छाद मांडला. काश्मिरी पंडितांचे लोंढे काश्मिरमधून याच काळात बाहेर पडले.

नरसिंह रावांच्या काळात मुफ्तींनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला परंतु नंतर १९९९ मध्ये त्यांनी मुलगी मेहबुबा हिच्या सहकार्याने पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली.

भारत पाकिस्तानचे संबंध सुधारावेत काश्मिरींच्या समस्या सुटाव्यात शांतता कायम राखण्यासाठी संवादांची प्रक्रिया सुरू ठेवावी या दिशेने सातत्याने प्रयत्न केलेल्या आणि काँग्रेस तसेच भाजपा दोन्ही मुख्य पक्षांशी सामंजस्य राखलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांची जम्मू व काश्मिरमधली प्रतिमा आम जनतेचा माणूस अशी आहे.