ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 03:17 PM2021-03-11T15:17:11+5:302021-03-11T15:23:18+5:30

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तृणमूलला गळती; दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकारणाची पश्चिम बंगालमध्ये होणार पुनरावृत्ती होण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात भारतीय जनता पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे बंगालमधील विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तृणमूलला मोठी गळती लागली आहे. तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये चांगलीच जुंपली आहे.

आपल्यावर झालेला हल्ला षडयंत्राचा भाग असल्याचा दावा करत ममता बॅनर्जींनी भाजपवर आरोप केला आहे. तर विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ममता बॅनर्जींच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळेच सहानुभूतीसाठी त्या नाटक करत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

ममता बॅनर्जी थेट भाजपवर आरोप करत असताना भाजपनं मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. ममता बॅनर्जींवर हल्ला झालाचा नसल्याचा भाजपचा दावा आहे. तसे व्हिडीओदेखील त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी सक्तवसुली संचलनालयाच्या एका एफआयआरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव आलं. यानंतर पवारांनी थेट ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार ईडी कार्यालयात जाणार, त्या दिवशी राष्ट्रवादीनं मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. भाजप, मोदी सरकार विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादीनं केली.

पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना पोलीस आयुक्त त्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी पवारांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केला.

ईडीच्या अहवालानंतर राजकारण फिरलं होतं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागले. त्यामुळे ईडीमुळे राष्ट्रवादीला बूस्टर डोस मिळाला. ममता बॅनर्जी या शरद पवार यांच्याप्रमाणेच मुरब्बी राजकारणी आहेत. त्यामुळे पवारांप्रमाणे ममता बॅनर्जीदेखील गेम पलटवणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

ममता बॅनर्जी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. रुग्णालयातील त्यांचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०१९ मध्ये शरद पवार प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरले. त्यावेळी त्यांच्या पायालादेखील दुखापत झाली होती. त्यावेळी बँडेज लावण्यात आलेल्या पवारांच्या पायांचा फोटो व्हायरल झाला होता.

शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आजही सगळ्यांच्या लक्षात आलं. त्या एका सभेनं वातावरण फिरलं होतं. त्यावेळी शरद पवारांना धरून व्यासपीठावर आणण्यात गेलं. कारण त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र त्या परिस्थितीतही पवारांनी जोरदार भाषण केलं.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक महत्त्वाचे नेते शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले. ममता बॅनर्जीदेखील सध्या याच परिस्थितीतून जात आहेत. त्यांच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळेच सध्या विधानसभेत केवळ तीन आमदार असलेला भाजप ममतांना आव्हान देत आहे.

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात आणखी एक साम्य आहे. हे दोन्ही कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन करून यशस्वी झालेले मोजकेच नेते देशात आहेत. त्यात शरद पवार आणि ममता बॅनर्जींचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.