Bihar Result: साधी राहणी, उच्च विचारसरणी! चौथ्यांदा आमदार बनले पण राहायला पक्क घरही नाही

By प्रविण मरगळे | Published: November 14, 2020 04:23 PM2020-11-14T16:23:37+5:302020-11-14T16:26:44+5:30

भारतीय राजकारणात खूप मोजकेच नेते असे सापडतात ज्यांना खऱ्याअर्थाने लोकसेवा करण्याची इच्छा असते. अनेकांना राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचे माध्यम वाटतं, एकदा निवडून आल्यानंतर पुढील ५ वर्षात नेत्याची संपत्ती दुप्पट होते.

मात्र राजकारणात अद्यापही काही नेते असे आहेत, ज्यांच्याकडे पाहून राजकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे राजकारणी अनेक वर्ष राजकारण करतात, निवडून येतात, लोकांची कामे करतात परंतु त्यांचं राहणीमान सर्वसामान्य जनतेप्रमाणेच असते.

अलीकडेच बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीचे निकालही लागले. यात एनडीएला बहुमत मिळालं आहे. या निकालात बिहारच्या कटिहार जिल्ह्यात राहणारे महबूब आलम हे त्यांच्या प्रामाणिक आणि चांगल्या स्वभावामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत.

साधी राहणी, उच्च विचारसरणी याचं उदाहरण म्हणून महबूब आलम यांच्याकडे पाहता येईल. चौथ्यांदा आमदार बनले तरीही अद्याप महबूब यांच्याकडे स्वत:चं पक्क घर नाही. महबूब आलम कटिहारच्या बलरामपूर येथून निवडून आले आहेत.

इतकचं नाहीतर बिहारच्या निकालात सर्वाधिक विजयी मतांनी महबूब आलम निवडून आले आहेत. चौथ्यांदा निवडणुकीत उभे राहून महबूब आलम जिंकले, त्यांच्याकडे पक्क घर नाही परंतु आजही त्यांना कुठे जायचं असेल तर ते सार्वजनिक वाहतूक अथवा पायी प्रवास करतात.

रिपोर्टनुसार बिहार निवडणुकीत यंदा ८१ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. यात महबूब आलम आमदार आहेत ज्यांच्याकडे पक्क घर आणि गाडीही नाही. आपल्या साध्या राहणीमानामुळे महबूब आलम स्थानिक परिसरात प्रचंड लोकप्रिय आहेत.

महबूब आलम कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावर चौथ्यांदा निवडून आले आहेत. कटिहारच्या बलरामपूर येथून ते आमदार आहेत. या मतदारसंघात महबूब आलम तब्बल ५३ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत हा त्यांचा मोठा विजय आहे.

महबूब आलम यांचे वय ४४ असून ते १० वी पास आहेत. व्यवसायाने ते शेती करतात. त्यांचे उत्पन्नही शेतीवर आधारित आहे. त्यांच्या या राहणीमानामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत मेहबूब आलम वेगळे ठरतात, लोकांची काम करत असल्याने लोकही त्यांना भरभरून मतदान करतात.

महबूब आलम यांच्यावर २०१६ मध्ये एका बँक मेनेजरला मारहाण केल्याचा आरोप लागला होता. त्यावेळी आलम यांनी आरोप फेटाळून लावले होते. २०१५ च्या निवडणुकीत आलम यांनी भाजपा उमेदवार वरूण कुमार यांना २० हजारांच्या मतांनी हरवलं होतं.

महबूब आलमसारखे नेते भारतीय राजकारण खूप कमी सापडतात. अन्यथा राजकारणी नेते, भ्रष्टाचार, घोटाळा हे समीकरण बनलं आहे. राजकारणात काही अपवाद वगळता प्रत्येक नेत्याची संपत्ती दर ५ वर्षांनी दुप्पट होत असते. त्याच बिहारच्या निवडणुकीत चौथ्यांदा आमदार झालेले महबूब आलम सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.