…म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:30 PM2020-05-21T13:30:08+5:302020-05-21T13:35:22+5:30

राज्याच्या राजकारणात सहा महिन्यांपूर्वी जो सत्तासंघर्ष चालला त्याने राज्यातील राजकारण बदलून गेलं. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजपात यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा निर्माण झाला.

सत्तासंघर्षाच्या कालावधीत राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडी सर्वांसाठी चर्चेच्या विषय होत्या. राज्यातील प्रमुख नेते एकमेकांच्या भेटीगाठी करत होते. राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती.

क्षणोक्षणी बदलणाऱ्या घडामोडींमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला होता. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात येणार असं चित्र निर्माण झालं.

पण एके दिवशी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेत अनेकांना धक्का दिला. राष्ट्रवादीचे किती आमदार फुटले याची चर्चा सुरु झाले. अजित पवारांचे बंड राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजले.

शरद पवारांचे पुतणे असलेल्या अजित पवारांनी बंड का केले? हे अनेकांना पडलेला प्रश्न आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या चेकमेट पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात अजित पवारांच्या बंडाबाबतही गौप्यस्फोट आढळतो.

सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तर जयंत पाटील यांना गृह खात्यासह उपमुख्यमंत्री करायचं हे जवळपास निश्चित झालं होतं. या कारणामुळे अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु होती.

पडद्यामागे घडणाऱ्या अनेक गोष्टी या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अजित पवारांचे बंड हे कार्यकर्त्यांसाठी न उलगडणारं कोडं आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरुनच हे बंड झालं असावं असंही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते.

अजित पवारांनी बंड का केले? याबाबत चेकमेट पुस्तकात दावा केला आहे की, शिवसेनेसोबत वाटाघाटी झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंना देण्याचं ठरलं. त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळेंचे नाव पुढे आले.

इतकचं नाही तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद मिळणार असल्याने अजितदादा प्रचंड नाराज झाले. यामुळे आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती अजित पवारांना होती. त्यामुळे अजित पवारांनी घेतलेला निर्णय सर्वांना धक्का देणारा ठरला.

दुसरीकडे राज्यातील सत्ता हातातून जात असल्यानं देवेंद्र फडणवीस हेदेखील तणावाखाली होते. आदल्या २२ नोव्हेंबरच्या रात्री बऱ्याच घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीची बैठकीतून अजित पवार बाहेर पडले अन् थेट घरी गेले.

त्यानंतर पुन्हा घरातून अजितदादा बाहेर आले, गाडी अर्धा वाटेत गेल्यावर त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडीतून अजितदादा उतरले त्यानंतर ड्रायव्हरला जाण्यास सांगितले. अजितदादांनी दुसरी गाडी पकडली.

देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या गाडीचा ताफा सोडून खासगी गाडीतून सोफिटल हॉटेलच्या मागच्या दाराने आत गेले. याठिकाणी अजित पवार आणि फडणवीसांची सविस्तर चर्चा झाली. अजितदादांनी ३८ आमदार फोडण्याची तयारी केली होती.

हा सगळा प्रकार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना सांगितला होता. ३८ आमदारांपैकी २० जणांना मंत्रिपद देण्याची तयारी झाली होती. शरद पवारांना याबाबत काहीच माहिती नव्हते. त्यामुळे अजितदादांनी खबरदारीने सर्व घडामोडी लपवून ठेवल्या होत्या.

त्यानंतर २३ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला होता.