Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:33 PM2021-07-26T19:33:25+5:302021-07-26T19:36:52+5:30

भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात 49 किलो वजनी गटाचे रौप्यपदक नावावर करून इतिहास रचला. तिनं स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. मीराबाईच्या या कामगिरीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं पदकाचे खाते उघडले.

मीराबाई चानूनं पदक जिंकल्यानंतर तिच्यासाठी रोख रकमेसह कायमस्वरूपी नोकरीची घोषणाही झाली. पण, हे ऐतिहासिक पदक मिळवण्यामागे तिची प्रचंड मेहनत होती आणि तेव्हा तिला खऱ्या मदतीची गरज होती. अनेक संकटावर मात करत इतिहास घडवला.

मीराबाईनं या पदकासाठी मागील 6 वर्ष प्रचंड मेहनत घेतली. कडक डाएट आणि ट्रेनिंग रुटीन फॉलो केलं. जाणून घेऊया तिचे सरावाचे वेळापत्रक अन् डाएट प्लान... Silver medalist Mirabai Chanu diet and Weight training schedule revealed, See pic

मीराबाई चानूनं 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आणि तिला एवढेच वजय कायम राखण्यासाठी कोचिंग टीममधील सदस्य एपी दतन यांनी मदत केली. एपी दतन यांनी एका मुलाखतीत मीराबाईचा डाएट प्लान सांगितला. दतन हे मीराबाईच्या डाएटवर सर्व लक्ष ठेऊन असायचे.

मनोरमा न्यूजमधील एका वृत्तानुसार दतन यांनी सांगितले की, नाश्त्यात अंडे, दोन ब्रेड आणि पांच प्रकारची फळ असायची अन् त्यात एवाकाडोचाही समावेश होता. लंचमध्ये मीराबाई मासे व सॅलमन, टूना आणि पॉर्क मीट खायची, जे थेट नॉर्व्हेतून यायचे. मासे, पॉर्क हे 100 ते 150 ग्रामच खायची.

वजन 49 किलोपेक्षा जास्त होऊ नये यासाठी तिची ट्रेनिंगही तशीच करून घेतली जायची. दतन सांगतात, मीराबाई सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दोनवेळा वेट ट्रेनिंग सेशन करायची, तर मंगळवारी, गुरूवारी एकच वेट ट्रेनिंग सेशन असायचे.

दातन यांच्या सांगण्यानुसार मीराबाई चानू दररोज 8 तास जिममध्येच व्यायाम करायची. सकाळी 6.30 वाजता तिच्या ट्रेनिंगला सुरुवात व्हायची आणि दीड तास ती कसून मेहनत घ्यायची. त्यानंतर 10 ते 1 आणि संध्यासाळी 4.30 ते 7.30 अशी ट्रेनिंग करायची.