Tokyo Olympic, Neeraj Chopra : शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:04 PM2021-08-07T18:04:56+5:302021-08-07T18:08:22+5:30

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. चेक प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती.

हरयाणा येथील पानीपत जिल्ह्यातील खंद्रा गावात एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील नीरजचा जन्म... लहानपणी त्याला खेळण्यासाठी मैदानही नव्हत आणि मग भालाफेकीचा प्रश्नच नाही. अन्य मुलांसोबत तो क्रिकेट खेळायचा, परंतु २०११मध्ये त्याची भालाफेक खेळाशी ओळख झाली.

२०११मध्ये पानीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात त्याचे काका त्याला घेऊन गेले. तेव्हा तो १३ वर्षांचा होता आणि त्याचे वजन जवळपास ७७ किलो इतके होते. तेथे त्यानं भालाफेकपटूंकडून काही टिप्स घेतल्या आणि काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यानं जिल्हा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

खेळासाठी त्यानं कुटुंबीयांना भारतीय क्रीडा प्राधिकरणात राहण्याची परवानगी मिळाली यासाठी तयार केले. तेव्हा तो फक्त १४ वर्षांचा होता. अथक मेहनत व कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव गाजवले.

२०१८साली पार पडलेल्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम नीरज चोप्रानं केला. त्यानं ८८.०७ मीटर भालाफेक करताना स्वतःच्याच नावावरील राष्ट्रीय विक्रम मोडला. २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्यानं ८८.०६ मीटर लांब भालाफेक केली होती. त्या स्पर्धेत तो भारताचा ध्वजधारक होता.

त्यानं २०१६मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर २०१६मध्ये त्यानं २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकताना ८६.४८ मीटर लांब भालाभेक करून २० वर्षांखालील गटात वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

२०१७च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेचेही जेतेपद त्याच्या नावावर राहिले. तो सध्य जर्मनीच्या क्लॉस बार्तोनिएत्झ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. याआधी त्यानं गॅरी कॅल्व्हर्ट, वेर्नेर डॅनिएल्स आणि उवे होहन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते.

२४ डिसेंबर १९९७मध्ये त्याचा जन्म झाला, तो भारतीय सैन्यात Junior Commissioned Officer (JCO) या पदावर कार्यरत आहे. हरयाणा येथील पानीपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील त्याचा जन्म. त्यानं चंदीगढ येथील DAV महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. ३१ मार्च २०२०मध्ये त्यानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधीत २ लाखांची मदत केली होती.