Tokyo Olympic Medal Tally : १३ व्या दिवशी भारतानं जिंकली दोन पदकं, जाणून घ्या चीन, अमेरिकेसोबतच्या शर्यतीत आपण कितव्या स्थानी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 11:11 PM2021-08-05T23:11:34+5:302021-08-05T23:13:23+5:30

Tokyo Olympic Medal Tally : गुरुवारचा दिवस हा भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद खिळवणारा ठरला. ज्या भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिक सुवर्ण काळाबद्दल आपल्यापैकी अनेकांनी फक्त ऐकले होते, तो सुवर्णकाळ नव्यानं सुरू होताना आज सर्वांनी पाहिला.

१९८० नंतर भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक नावावर केले.( India WIN BRONZE medal after defeating Germany 5-4) भारतानं बलाढ्य जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवला.

त्यानंतर कुस्तीपटू रवी कुमार दहिया ( Ravi Kumar Dahiya) यानं ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करताना भारताच्या खात्यात पाचवे पदक जमा केले.

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat's Bronze medal chances (via Repechage) eliminated as her QF victor Vanesa loses in Semis) हिला उपांत्यपूर्व लढतीत विनेशला बेलारूसच्या वनेसा कालाडझिन्स्कायाकडून ३-९ असा पराभव पत्करावा लागला. विनेशसाठी रिपीचेज राऊंडचा पर्याय होता, परंतु बेलारुसच्या खेळाडूचा उपांत्य फेरीत पराभव झाला अन् विनेशच्या पदकाच्या आशाही मावळल्या.

पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या दीपक पुनियाला अखेरच्या ३० सेकंदात पदकानं हुलकावणी दिली. सॅन मारिनोच्या अॅमिने मायलेस नाझेमनं हा सामना ४-२ असा जिंकला.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा १३वा दिवस आज संपला अन् भारतानं २ रौप्य व ३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टर मिराबाई चानूनं रौप्य, तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू व बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोईन यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे. १३व्या दिवसअखेर भारत ५ पदकांसह ६५ स्थानावर आहे.

चीन ३४ सुवर्ण, २४ रौप्य व १६ कांस्य अशा एकूण ७४ पदकांसह अव्वल स्थानावर आहे. अमेरिका ९१ पदकांसह दुसऱ्या ( २९ सुवर्ण, ३५ रौप्य व २७ कांस्य), तर यजमान जापान ४६ पदकांसह तिसऱ्या ( २२ सुवर्ण, १० रौप्य, १४ कांस्य) स्थानावर आहे.