Tokyo Olympic 2020 : चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:17 PM2021-07-30T13:17:16+5:302021-07-30T13:20:10+5:30

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले.

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

लवलिनानं किमान कांस्यपदक निश्चित केलं आहे आणि तिनं सूवर्णपदक नावावर करून भारतात यावं अशी देशवासियांची इच्छा आहे. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे आणि त्यामुळे या पदकाचे मोल सर्वांपेक्षआ तिला व तिच्या कुटुंबीयांसाठी अधिक आहे.

पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटमध्ये सराव करणारी लवलिना फेब्रुवारीत दोनवेळा घरी गेली. तिची आई ममोनी बोर्गोहेन ( mother Mamoni Borgohain ) यांना किडनीचा विकार झाला आणि त्यांच्यावर कोलकाता येथे ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी ती आईसोबत होती.

तेव्हापासून ती घरच्यांपासून दूरच आहे आणि आता ती ऑलिम्पिक पदक घेऊन घरी जाणार आहे. विजेंदर सिंग, मेरी कोम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर आहे. तिचे कुटुंबीयही स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. तिच्या आईच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि लवलिनाला तिचीच चिंता होती, ती रात्रभर झोपतही नव्हती. तिच्या आईला डोनर मिळाला, तेव्ही त्यावेळी आईसोबतच तिला रहायचे होते. दोन दिवस ती आईसोबत होती.

''माझ्या पत्नीला दुसरं आयुष्य मिळालं आणि आता लवलिना पदक घेऊन घरी येणार आहे, यापेक्षा अधिक काय हवंय,''असे लवलिनाचे वडील टिकेन बोर्गोहेन सांगतात. टिकेन हे बारोमुखिया येथील चहाच्या मळ्यात काम करतात. लवलिना लहान असताना जुळ्या बहिणी लिमा व लिचा यांना मुआय थाय ( बॉक्सिंग आणि टायक्वांडो यांचा एकत्रित क्रीडा प्रकार) खेळताना पाहायची.

कुटुंब आर्थिक संकटाशी झगडत असूनही टिकेन यांनी मुलींची खेळाडू बनण्याची आवड जपली. त्यांचे स्वतःचं छोटसं शेत होतं आणि शिवाय ते चहाच्या मळ्यात काम करायचे, त्यासाठी त्यांना महिन्याला २५०० रुपये मिळायचे. लिमा व लिचा मार्शल आर्ट्स खेळायच्या आणि लवलिनानेही तोच खेळ स्वीकारला.

मुलींचे खेळाडू बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी माझ्या पत्नीनं ५० हजार ते दीड लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यांच्या या बलिदानाचं आज चीजं झाले. लवलिनानं तीन वर्ष मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. ती आसामची चॅम्पियन बनली आणि २०१०मध्ये राष्ट्रीय जेतेपदही पटकावलं.

पण, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक पदम बोरो यांनी तिच्यातले गुण हेरले अन् तिला बॉक्सिंग अकादमीत सराव घेण्यास सांगितले. त्यासाठी २०१२साली तिला घरापासून ३०० किलोमीटर दूर गुवाहाटी येथे शिफ्ट व्हावे लागले. त्याच वर्षी तिनं कोलकाता येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. पुढील तीन वर्षांत तिनं चार आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली.