India at Commonwealth Games 2018: या दहा खेळाडूंकडून आहेत भारताला सुवर्णपदकाचा अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 01:55 PM2018-04-04T13:55:12+5:302018-04-04T13:55:12+5:30

१.पी.व्ही. सिंधू : रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावल्यावर सिंधूच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये भारताची अव्वल खेळाडू तीच ठरली आहे. त्यामुळे सिंधूकडून या स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. गेल्या स्पर्धेत सिंधूने कांस्यपदक पटकावले होते. यावेळी ती सुवर्णपदक पटकावते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

२.जीतू राय: ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत जीतूने सुवर्णपदकाची कमाई केली होती. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई केली आहे. पण रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ११ एप्रिलला सकाळी चार वाजता जीतू सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.

३.मेरी कोम : अनेक जागतिक बॉक्सिंग स्पर्धांची विजेतेपद नावावर असणाऱ्या मेरी कोमने ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक विजेती कामगिरी केली आहे. मेरीचे आत्ताचे वय ३५ वर्षे आहे, त्यामुळे तिच्यासाठी ही अखेरची स्पर्धा ठरू शकते. त्यामुळे आपल्या अखेरच्या स्पर्धेत मेरी सुवर्णपदक पटकावते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

४.साक्षी मलिक : रियो ऑलिम्पिकमध्ये साक्षीने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. ग्लासगोमध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले होते. सध्याच्या घडीला साक्षी ही भारतातील अव्वल महिला कुस्तीपटू आहे. त्यामुळे ती या स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

५. सायना नेहवाल : सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते, पण त्यानंतर मात्र तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण तिच्याकडे खेळाचा दांडगा अनुभव आहे, त्यामुळे तिच्याकडून देशवासियांना सुवर्णपदकाची अपेक्षा असेल.

६.किदाम्बी श्रीकांत : भारताला श्रीकांतकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. कारण या स्पर्धेसाठी श्रीकांतने काही स्पर्धांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. जागतिक क्रमवारीत तो सध्याच्या घडीला तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीकांतने २०१७ साली चार मोठ्या स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेत तो काय कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

७.विकास कृष्णन : सध्याच्या घडीला बॉक्सिंगपटू विकास हा चांगल्या फॉर्मात आहे. आपल्या पहिल्या आशियाई स्पर्धेत विकासने सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे यावेळी त्याच्याकडून आशियाई स्पर्धेसारखी सातत्यपूर्ण कामगिरी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

८.नीरज चोप्रा : ज्यूनियर स्तरावर भालाफेकीचा विश्व विक्रम नीरजच्या नावावर आहे. त्यामुळे पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्राकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. १० एप्रिलला दोन वाजता नीरजची स्पर्धा होणार आहे, त्यामुळे यावेळी त्याच्यावर साऱ्यांचे लक्ष असेल.

९.मेहुली घोष : वयाच्या सतराव्या वर्षी नेमबाजीमध्ये भारताकडून प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला आहे तो मेहुली घोषला. भारताच्या पथकातील ती सर्वात तरुण खेळाडू आहे. आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे तिच्याकडून भारताल मोठ्या अपेक्षा असतील.

१०.संजिता चानू : ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत संजिताने सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी भारताच्या मीराबाई चानूला तिने पराभूत केले होते. ७७ किलो वजनीगटामध्ये तिने १७३ किलो वजन उचलत सोनेरी कामगिरी केली होती. यावेळी ५५ किलो वजनीगटामध्ये ती खेळणार असून यावेळी ती देशाला सुवर्णपदक जिंकवून देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.