75 years of independence : मिल्खा सिंग ते नीरज चोप्रा! ७५ वर्षांतील क्रीडा क्षेत्रातील भारताचा 'सुवर्ण' इतिहास, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 07:38 PM2022-08-14T19:38:14+5:302022-08-14T19:45:55+5:30

75 years of independence Top Achievements Of India In Sports : २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं होतंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे. १९४७ ते २०२२ या काळात भारतीयांनी अनेक प्रांतात आपला तिरंगा डौलाने फडकवला.

विविध क्षेत्रात आपले नाव गाजवले. क्रीडा क्षेत्राचा विचार केल्यास सध्याच्या घडीला पी व्ही सिंधू, विराट कोहली, रोहित शर्मा, नीरज चोप्रा, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, निखत जरीन, मीराबाई चानू आदी खेळाडू जगावर राज्य गाजवत आहेत. भारताच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातील क्रीडा विभागातील यशांवर टाकलेली एक नजर....

१९४८मध्ये भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी करून दाखवली. लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर नमवून स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले होते. भारतीय हॉकी संघाच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्ण, १ रौप्य व ३ कांस्यपदकं आहेत. १९७५मध्ये भारताने हॉकी वर्ल्ड कप उंचावला होता. मलेशियात झालेल्या या वर्ल्ड कप मध्ये भारताने २-१ अशा फरकाने पाकिस्तानला नमवले होते. सुरजित सिंग व अशोक कुमार यांनी विजयी गोल केले होते.

१९८३चा क्रिकेट वर्ल्ड कप कोणीच विसरणार नाही. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला नमवून वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर २८ वर्षांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर भारताने पुन्हा वन डे वर्ल्ड कप जिंकला. २०११च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत केले. तत्पूर्वी, २००७मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला वहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.

१९५१ मध्ये पहिली आशियाई स्पर्धा भारतातच खेळवण्यात आली आणि त्यानंतर १९८२ मध्ये भारतात पुन्हा आशियाई स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण १५५ सुवर्ण, २०१ रौप्य व ३१६ कांस्यपदकं अशी एकूण ६७२ पदकं जिंकली आहेत. यापैकी सर्वाधिक २५४ पदकं ही अॅथलेटिक्समधून आली आहेत. त्यापाठोपाठ कुस्ती ( ५९), नेमबाजी ( ५८), बॉक्सिंग ( ५७), टेनिस ( ३२) असा क्रम येतो.

१९५८मध्ये मिल्खा सिंग हे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. त्यांनी ४४० यार्डच्या शर्यतीत ही सुवर्ण कामगिरी केली होती. त्यानंतर आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात २०२ सुवर्ण, १९० रौप्य व १७१ कांस्य अशी ५६३ पदकं जमा झाली आहेत. नीरज चोप्रा, मीराबाई चानू, अंजु बॉबी जॉर्ज, कर्नम मलेश्वरी, अचंथा शरथ कमल हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे स्टार आहेत.

१९५१ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघानेही सुवर्णपदक जिंकले होते. १९६२ मध्ये भारतीय फुटबॉल संघाने सुवर्णपदक कायम राखले आणि १९७०मध्ये त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यानंतर भारतीय फुटबॉलची अवस्था काय झाली हे सांगायला नको, आता पुन्हा भारत जागतिक स्तरावर नाव कमावण्यासाठी प्रयत्न करतोय.

रामनाथन कृष्णन यांनी १९६०च्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय होते. १९६१ मध्येही त्यांनी टॉप फोअर मध्ये स्थान पटकावले होते. लिएंडर पेस, महेश भुपती, सानिय मिर्झा या भारतीय टेनिसपटूंनी ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवून देशाचे नाव अटकेपार नेले आहे.

प्रकाश पादुकोन यांनी १९८०मध्ये इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत क्रांती घडवली. ही स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले, त्यानंतर २००१मध्ये पुल्लेला गोपिचंद यांनी हा पराक्रम केला. सायना नेहवाल व लक्ष्य सेन हे उपविजेतेपदापर्यंत मजल मारू शकले आहेत. बॅडमिंटनचा विचार केल्यास पादुकोन, गोपिचंद यांच्यानंतर आताच्या जनरेशनला माहीत असणारे खेळाडू म्हणजे सायना, पी व्ही सिंधू, पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन या सर्वांनी अनेक स्पर्धा गाजवल्या. सायनाने चिनी मक्तेदारीला आव्हान देत ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. त्यानंतर सिंधूने रौप्य व कांस्य अशी दोन ऑलिम्पिक पदकं नावावर करून इतिहास घडविला.

विश्वनाथन आनंद या नावाची दखल संपूर्ण जग घेत... बुद्धीबळाच्या पटावरील सम्राट असे आनंदला म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. २०००मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकून इतिहास घडविणारा तो पहिला भारतीय बुद्धीबळपटू ठरला. त्याने पाच वेळा जागतिक जेतेपद नावावर केले आहे.

२००८मध्ये भारतीय बॉक्सरना ऑलिम्पिकमध्ये खरी ओळख विजेंदर सिंगने मिळवून दिली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरला. त्यानंतर मेरी कोम व लवलिना बोरगोहाई यांनी ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. मेरी कोमने तर बॉक्सिंगमध्ये तिचं नाव सुवर्णाक्षराने लिहिले आहे. तिचा प्रेरणादायी प्रवास अनेक मुलींना या खेळाकडे घेऊन आला आणि यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही मुंलींनी बॉक्सिंगमध्ये कमाल करून दाखवली. निखत जहीन ही सध्याची जागतिक विजेती बॉक्सर आहे.

१९५२मध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून दिले. कुस्तीसाठी ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यानंतर २०१२मध्ये सुशील कुमारने कुस्तीचे पदक जिंकले. योगेश्वर दत्त, साक्षी मलिक व बजरंग पुनिया हे ऑलिम्पिक गाजवणारे भारतीय कुस्तीपटू आहेत. यांनी राष्ट्रकुलमध्येही आपापला दबदबा सिद्ध केला आहे.

खाशाबा जाधव यांच्यानंतर २००८मध्ये भारताने ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकले आणि तेही सुवर्ण... नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी हा पराक्रम करून दाखवला.

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. तिच्या ताकदीला तोडच नाही. कर्नम मलेश्वरीचा वारसा ती दुप्पट ताकदीने पुढे चालवतेय...

२०२१ व २०२२ हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्राला आणखी एका उंचीवर घेऊन जाणारे ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा हा नवा स्टार भारताला मिळाला. भालाफेकीत त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्याच्या या कामगिरीमुळे अॅथलेटिक्समध्ये क्रांती घडली आणि त्याची प्रचिती २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाहायला मिळाली. अविनाश साबळे, मुरली श्रीशंकर, अब्दुल्लाह अबूबाकेर, तेजस्वीन शंकर ही नवी नावं समोर आली.