जेव्हा जेव्हा अडचणीत आले मोदी सरकार, मदतीला धावून गेले शरद पवार; या घटना आहेत साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:29 PM2020-06-29T14:29:42+5:302020-06-29T15:05:21+5:30

२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शरद पवार यांनी अनेकदा मोदींना अनुकूल भूमिका घेतलेली आहे. मोदी आणि पवार अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे.

लडाखमधील काही भागात चीनकडून घुसखोरी झाल्याचे येत असलेले वृत्त आणि गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण असताना राजधानी दिल्लीत मात्र यावरून भाजपा विरुद्ध काँग्रेस असे राजकारण पेटलेले आहे.

एकीकडे चिनी घुसखोरीवरून आक्रमक होत राहुल गांधी आणि काँग्रेस मोदी सरकारची कोंडी करत असताना दुसरीकडे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र मोदी सरकारचा बचाव करत राहुल गांधींनाच खडेबोल सुनावले आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण न करण्याचा सल्लाही दिला आहे.

मात्र शरद पवार यांनी मोदींचा बचाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही काँग्रेसकडून मोदींची कोंडी करण्याचे जेव्हा जेव्हा प्रयत्न झाले, तेव्हा शरद पवार हे मोदींच्या मदतीला धावून गेल्याचे दिसून आले आहे. अशाच काही घटनांचा घेतलेला हा आढावा.

राफेल करार - Marathi News | राफेल करार | Latest national Photos at Lokmat.com

भारत आणि फ्रान्सच्या सरकारमध्ये झालेल्या राफेल विमान करारामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आकाश पाताळ एक केले होते. या मुद्द्यावरून मोदी सरकारची कोंडी करून सरकारविरोधात वातावरण निर्मितीही केली होती. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी या करारावरून मोदी सरकारबाबत मवाळ भूमिका घेतली. होती. जनतेला मोदींच्या हेतूबाबत शंका नाही आहे. तसेच राफेल विमान खरेदीमधील तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याची विरोधी पक्षाची मागणी योग्य नाही, असे विधान करून शरद पवार यांनी राफेल विमान करारावरून मोदी सरकारविरोधात होत असलेल्या आरोपांची धार बोथट करून टाकली होती.

शरद पवार यांच्या या विधानाचा भाजपाने पुरेपूर लाभ उठवला होता. देशाचे माजी संरक्षणमंत्री असलेले शरद पवार यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून देशहितामध्ये भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस आघाडीमधील ज्येष्ठ सहराकी असलेल्या शरद पवार यांच्याकडून काही तरी शिकावे, असे ट्विट तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते.

राज्यसभा उपसभापती निवडणूक २०१८ - Marathi News | राज्यसभा उपसभापती निवडणूक २०१८ | Latest national Photos at Lokmat.com

गतवर्षी राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांकडून एनडीएविरोधात उमेदवार उतरवणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र शरद पवार यांनी अचानक उमेदवार उतरवण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसला ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांना ऐनवेळी उमेदवारी घोषित करावी लागली. मात्र त्यांचा पराभव झाला.

गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ - Marathi News | गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ | Latest national Photos at Lokmat.com

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सरकारविरोधी वातावरणाचा लाभ घेऊन काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. विरोधी पक्षांकडूनही काँग्रेसला चांगली साथ मिळत होती. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसशी आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ - Marathi News | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ | Latest national Photos at Lokmat.com

२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तसेच मुख्यमंत्री पदावर दावा करता यावा यासाठी भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. पाठोपाठ शरद पवारांनीही काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तसेच निकालानंतर भाजपाला सत्तेसाठी काही जागा कमी पडत असल्याचे दिसताच भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.