भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्यामागचं खरं कारण काय?; नवीन रिपोर्टमधून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:56 PM2022-05-13T12:56:54+5:302022-05-13T13:04:35+5:30

भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढतेय? देशात गूगलवर सर्वाधिक सर्च होणारा प्रश्न, लोकांमध्ये भारतीय मुस्लीमांच्या जन्मदराबाबत खूप उत्सुकता आहे. गेल्या अनेक दशकांपासून मुस्लीमांचा जन्म दर इतरांहून जास्त आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, प्रत्येक मुस्लीम महिला तिच्या आयुष्यात सरासरी २.३६ मुलांना जन्म देते, जे राष्ट्रीय सरासरी १.९९ पेक्षा खूप जास्त आहे. त्याच वेळी, जर आपण हिंदूंबद्दल बोललो, तर त्यांचा जन्मदर १.९४ राष्ट्रीय सरासरीपेक्षा खाली आहे.

तथापि, जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की मुस्लिमांमधील उच्च सरासरी जन्मदर हा केवळ धर्माचा मुद्दा नाही तर त्यामागे इतर अनेक कारणे आहेत - जसे की गरिबी आणि निरक्षरता. यामुळेच मुस्लीम वर्गही शिक्षण आणि समृद्धीच्या बाबतीत देशातील इतर धर्मांच्या बरोबरीने पुढे जात असल्याने त्यांच्यातही जन्मदर झपाट्याने कमी होत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २५ टक्के मुस्लीम महिला कधी शाळेत गेल्या नाहीत. तर केवळ २० टक्के महिलाच १२ वीपर्यंत पास झाल्या आहेत. शिक्षणाच्या बाबतीत इतके मागासलेले पण भारतात अन्य धर्मीयांच्या तुलनेने कुठेही नाही.

उत्तर प्रदेशात हिंदू महिलांमध्ये जन्मदर २.२९ इतका आहे तर तामिळनाडूत मुस्लीम महिलांमध्ये जन्मदर १.९३ आहे. तामिळनाडूत उत्तर प्रदेशाच्या तुलनेने सर्व धर्मियांमध्ये जन्म दर कमी आहे. जन्म दराचा सामाजिक वातावरणावरही परिणाम होतो.

सर्वात कमी शैक्षणिक पातळी असलेली राज्ये – बिहार (५५%), झारखंड (६१.७%) आणि UP (६६.१%) – सर्वात जास्त जन्मदर आहेत. उदाहरणार्थ, बिहारमध्ये कधीही शाळेत न गेलेल्या स्त्रियांचा सरासरी जन्मदर ३.७७ आहे. बिहारमध्ये हिंदू जन्मदर २.८८ तर मुस्लीम जन्मदर ३.६३ इतका आहे.

रिपोर्टनुसार, श्रीमंती आल्यानंतर जन्मदरात घट होत आहे. उत्पन्नाच्या आधारे कमी गटातील महिलांमध्ये जन्मदर २.६३ इतका आहे तर जास्त उत्पन्न गटात १.५७ इतका आहे. कारण शिक्षित महिला जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय जास्त करतात.

NFHS नुसार, ६५ टक्के घरगुती महिलांच्या तुलनेत ७४ टक्के कामाला जाणाऱ्या महिला गर्भनिरोधकाचा वापर करतात. गरिबांच्या तुलनेने श्रीमंत लोकांमध्ये कंडोमचा वापर ३.६३ पटीने जास्त आहे. त्यामुळे गर्भधारणेवर नियंत्रण मिळवता येते.

मुस्लिमांमधील जन्मदरात सर्व धर्मियांच्या तुलनेने सर्वाधिक घट होत असल्याचं चित्र पुढे आले आहे. हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील शैक्षणिक आणि गरीब-श्रीमंत अंतरदेखील कमी होत आहे. १९९२ झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार मुस्लीम जन्मदर ४.४१ होता तर हिंदू जन्मदर ३.३ इतका होता.

आता ३० वर्षानंतर हिंदू मुस्लीम समुदायातील जन्मदराचा आकड्यातील अंतर अर्ध्याहून अधिक कमी झालं आहे. यूपीत मुस्लीम जन्मदर २.६६ इतका आहे परंतु त्याठिकाणी मुस्लीम महिलांना १.८८ पेक्षा अधिक जन्मदर नसावी अशी इच्छा आहे.

मात्र केवळ ४७.४ टक्के महिलांनाच गर्भनिरोधक हाती लागत असल्याचं कारण सांगितले जात आहे. ४.४ टक्के विवाहित मुस्लीम महिला तर ३८.३ टक्के मुस्लीम पुरुष मुलांना जन्म देऊ इच्छित नाही. तर ५.६ हिंदू महिला आणि ४.०१ हिंदू पुरुषांना बाळ जन्माला नको असं वाटतं.

जन्मदराचा धर्माशी काहीही संबध नाही हे बोलणं योग्य नाही. मेघालयात ईसाई महिला मुस्लीम महिलांच्या तुलनेने जास्त मुलांना जन्म देतात. हे राज्य बिहारनंतर देशात दुसऱ्या नंबरवर आहे. ईसाई महिलांमध्ये मुस्लीमांच्या तुलनेने अधिक शिक्षण आणि श्रीमंती आहे.