आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:19 PM2020-08-21T17:19:27+5:302020-08-21T18:40:06+5:30

येत्या काळात नवीन वाहनांच्या नोंदणीचे (रजिस्ट्रेशन) नियम कठोर होऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकार वाहन मालकीसाठी आवश्यक असलेल्या "फॉर्म २०" मध्ये बदल करण्याची तयारी करत आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सरकारने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन (प्रारूप अधिसूचना) जारी केले आहे. यानुसार "फॉर्म २०" मध्ये दुरुस्तीसाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत.

"लोक नोंदणीमध्ये वाहनाची मालकी योग्यरित्या नोंदवत नाहीत, हे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे," असे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मालकीचे प्रकार स्पष्टपणे सूचित करण्यासाठी "फॉर्म २०" मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे.

उदाहरणार्थ... स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, न्यास, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल, पीडब्ल्यूडी, शैक्षणिक संस्था, स्थानिक अधिकारी, एकापेक्षा जास्त मालक, पोलीस विभाग इत्यादी तपशीलवार मालकीचे स्पष्टीकरण करण्यासाठी एक सुधारणा प्रस्ताव आहे.

सुधारणा प्रस्तावाच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जाईल की, मोटार वाहन खरेदी / मालकी / संचालनासाठी शासनाच्या विविध योजनांतर्गत अपंगांना जीएसटी व इतर सवलतींचा लाभ देण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सरकारने सातत्याने वाहनांच्या नोंदणीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.

याचबरोबर, गेल्या जुलै महिन्यात वाहन क्रमांक आणि नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्टतेसाठी अधिसूचना जारी होती.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवर नोंदणी चिन्हांनी नेमणूक या प्रकरणातील विसंगती सुधारण्यासाठी १४ जुलै २०२० रोजी, कार्यालयीन आदेश २३३९ (ई) ही अधिसूचना जारी केली होती.

टॅग्स :वाहनAutomobile