भयानक! दहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही; जिवंतपणी आईसह पाच मुलांचा झाला सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:09 PM2021-06-16T12:09:18+5:302021-06-16T12:16:11+5:30

लॉकडाऊनमुळे उपाशी राहण्याची वेळ; दोन महिने पुरेसं अन्न नसल्यानं संपूर्ण कुटुंब अशक्त

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. एक कुटुंब लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून उपाशी असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. हा प्रकार समोर येताच अनेकांना धक्का बसला.

महिलेची मोठी मुलगी विवाहित आहे. तिच्या पतीला सासरची माहिती मिळाली. त्यानंतर त्यानं उपाशी अवस्थेत असलेल्या सर्वांना मलखान सिंह जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं त्यानं एका एनजीओशी संपर्क साधला. आता एनजीओची मंडळी मदतीसाठी पुढे आली आहेत.

कुटुंबातील ६ सदस्यांना शेजारचे लोक काही चपात्या द्यायचे. त्या पाण्यासोबत खाऊन कुटुंब दिवस काढत होतं. मात्र गेल्या १० दिवसांपासून त्यांना अन्नाचा एक दाणाही मिळाला नाही.

खायला काहीच नसल्यानं कुटुंबातील सगळ्यांची स्थिती खालावली. एका एनजीओच्या मदतीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कुटुंबातील ४० वर्षीय महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. महिलेला एक मुलगी आणि चार मुलं आहेत.

महिलेच्या पतीचा गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या दोन दिवसांपूर्वी गंभीर आजारामुळे मृत्यू झाला. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी महिला एका कारखान्यात काम करू लागली. तिला ४ हजार रुपये पगार मिळत होता. मात्र लॉकडाऊनमुळे कारखाना बंद झाल्यानं उत्पन्न थांबलं.

कारखान्यातील नोकरी गेल्यानंतर महिलेनं इतर ठिकाणी प्रयत्न केले. मात्र रोजगाराचा प्रश्न सुटला. घरातील अन्नधान्यं संपल्यानं कुटुंबावर इतरांकडे हात पसरण्याची वेळ आली.

लॉकडाऊन संपताच मोठ्या मुलानं रोजंदारीवर मजुरी करण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी काम मिळायचं, त्या दिवशी घरात चूल पेटायची. इतर दिवशी उपासमार व्हायची. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची शारिरीक स्थिती बिकट झाली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागला. मोठ्या मुलाला रोजंदारीवर मिळणारं काम बंद झालं. कुटुंबाची स्थिती आणखी वाईट झाली. मागील दोन महिने पोटभर अन्न न मिळाल्यानं सगळ्यांनाच अशक्तपणा आला. त्यामुळे त्यांचं घरातून बाहेर पडणं बंद झालं. शेजारी देत असलेलं हाच त्यांचा आधार होता. त्यामुळे सगळेच जण खंगले. जिवंत सांगाड्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे.