राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 08:47 PM2020-07-29T20:47:41+5:302020-07-29T20:52:02+5:30

पूर्व लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव वाढल्यानं भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. फ्रान्समधून निघालेली ५ राफेल विमानं हरयाणाच्या अंबाला हवाई तळावर दाखल झाली आहेत.

राफेल भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानं भारताचं सामरिक सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेता राफेल विमानांना अंबाला हवाई तळावर तैनात करण्यात आलं आहे.

राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढलं असताना लवकरच नौदलही आणखी अत्याधुनिक होणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच MH-60-Romeo हेलिकॉप्टर्स दाखल होणार आहेत.

भारतानं अमेरिकेसोबत रोमियो हेलिकॉप्टर्ससाठी करार केला आहे. चीनसोबत निर्माण झालेला पाहता रोमियो हेलिकॉप्टर्सचा ताबा लवकरच भारताला देण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे.

दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. हिंदी महासागरात चिनी नौदलाचं प्राबल्य वाढलं आहे. या भागात चिनी पाणबुड्या मोठ्या प्रमाणात गस्त घालत असतात.

हिंदी महासागरात भारतीय नौदलासमोर चीननं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळेच अमेरिकेनं रोमियो हेलिकॉप्टर्सची डिलेव्हरी लवकरात लवकर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणबुड्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता रोमियोमध्ये आहे.

परदेशी मिलिट्री सेलच्या माध्यमातून रोमियो हेलिकॉप्टर्सची विक्री केली जाणार असल्याची माहिती लॉकहिड मार्टिनचे अधिकारी विल्यम एल. ब्लेयर यांनी दिली. लॉकहिड मार्टिन कंपनीकडून रोमियो हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाते.

'आम्ही लवकरात लवकर रोमियो हेलिकॉप्टर्स भारताला सोपवू. पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारताला रोमियो हेलिकॉप्टर्स मिळतील,' अशी माहिती ब्लेयर यांनी दिली.

लॉकहिड मार्टिनकडून २४ रोमियो हेलिकॉप्टर्स घेत असल्याची घोषणा फेब्रुवारीत करण्यात आली. हिंदी महासागरात चिनी पाणबुड्यांची सक्रियता वाढत आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं रोमियो हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

रोमियोची खरेदी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राफेलमुळे हवाई दल आणखी सुसज्ज झालं असताना आता रोमियोमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे.