माता न तू वैरिणी! म्हणून आईने पोटच्या पोराला धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:19 PM2021-07-23T12:19:01+5:302021-07-23T12:22:12+5:30

Crime News: आई ही आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते असं म्हणतात. पण या गृहितकाला धक्का देणारी घटना घडली आहे.

आई ही आपल्या मुलासाठी वाटेल ते करू शकते असं म्हणतात. पण या गृहितकाला धक्का देणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एका आईने तिच्या पोटच्या पोराला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने या मुलाच्या वडिलांना धावत्या ट्रेनमधून बाहेर उडी घेत मुलाचे प्राण वाचवले. आईने फेकल्यानंतर मुलगा खाली पडून सुमारे १०० मीटर मागे गेला होता. दरम्यान, सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे.

ही धक्कादायक घटना यमुनापारच्या छिवकी जंक्शनवर घडली. घटनास्थळी आरपीएफ आणि जीआरपीचे जवान उपस्थित होते. त्यांनी पीडित मुलगा आणि त्याच्या वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी मुलावर प्राथमिक उपचार केले असून, सध्या मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

प्रयागराज विभागातील छिवकी जंक्शन येथून गुरुवारी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी जनता एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी रवाना झाली. ज्यामध्ये चुनार, मिर्झापूर येथून बी २ या डब्यामध्ये शिवम सिंह आणि अंशू सिंह हे जोडपे प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक वर्षाचा मुलगा चुनार हासुद्धा होता. ते मुंबईच्या दिशेने जात होते.

शिवम सिंह हा मुंबईत सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो. कोरोनामुळे सर्व बंद असल्याने तो घरी आला होते. आता तो मुंबईला परत जात होता. मात्र प्रवासादरम्यान, त्यांचा मुलगा वारंवार रडत होता.

त्यामुळे पती शिवम सिंह याने या मुलाला शांत करण्यासाठी पत्नीला दूध पाजण्यास सांगितले. मात्र ही बाब पत्नी अंशू हिला रुचली नाही. त्यावर त्यांच्यात वाद सुरू झाला. अखेर संतापलेल्या अंशू हिने त्या एक वर्षाच्या मुलाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.

हा प्रकार पाहून सर्वांना धक्का बसला. सुदैवाने रेल्वेचा वेग जास्त नव्हता. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी ट्रेनमधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर सुमारे १०० मीटरपर्यंत धाव घेत त्यांनी मुलाला उचलले. यादरम्यान, तिथून दुसरी गाडी जात नव्हती. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले.

छिवकीचे आरपीएफ इन्स्पेक्टर जी.एस. उपाध्याय यांनी सांगितले की, कौटुंबिक प्रकरण आसल्याने जीआरपी आणि आरपीएफने याबाबत कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र मुलाचे प्राण आता धोक्याबाहेर आहेत. दरम्यान, मुलाला बाहेर फेकणाऱ्या महिलेची मानसिक स्थिती योग्य नव्हती, असा दावा लोकांनी केला आहे.

या घटनेनंतर मुलाचे वडील मुलाला घेऊन घरी गेले आहेत. तर आईच्या या कृत्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

Read in English