Pulwama Terror Attack : 'त्यानं' आपल्या लेकीचा चेहराही पाहिला नव्हता; शूरवीर बाबाची करूण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 03:15 PM2019-02-15T15:15:11+5:302019-02-15T15:50:39+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळले आहे. या हल्ल्यामध्ये राजस्थानमधील जवान रोहिताश लांबा हे शहीद झाले आहेत.

रोहिताश लांबा यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीला पाहण्यासाठी होळीच्या निमित्ताने रोहिताश त्यांच्या राजस्थानमधील घरी येणार होते. मात्र त्याआधीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले आहेत.

रोहिताश लांबा हे शहीद झाल्याचे वृत्त मिळताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. तर रोहिताश शहीद झाल्याचे समजल्यावर त्यांचे भाऊ जितेंद्र यांची तब्येत बिघडली आहे. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानला खडसावले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावार पाकिस्तान पुरस्कृत ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. संपूर्ण भारताला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते निश्चितच केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी समस्त भारतीयांना दिली.

पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (15 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस पक्ष शहीद जवानांचे कुटुंबीय, सुरक्षा दल आणि सरकारसोबत असल्याचे यावेळेस राहुल गांधींनी सांगितले. देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाहीय. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत, असेही त्यांनी म्हटले.