CoronaVirus Updates: देशात नव्या ५४ हजार ०६९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:44 AM2021-06-24T10:44:08+5:302021-06-24T10:45:05+5:30

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३२१ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले.

देशभरात बुधवारी ५४ हजार ०६९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०० लाख ८२ हजार ७७८ वर पोहचली आहे. देशात सध्या ६ लाख २७ हजार ०५७ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३२१ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ९१ हजार ९८१ वर पोहचली आहे. तसेच देशाचा दैनिक पॉझिटिव्हिटी रेट २.९१ टक्के आहे. हा दर सलग १७ व्या दिवशी ५ टक्क्यांहून कमी असल्याचं दिसून येत आहे.

राज्यात बुधवारी कोरोनाच्या १०,०६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यात १,२१,८५९ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे.

राज्यात ११,०३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५७,५३,२९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्युदर १.९९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.९५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,९७,५८७ झाली असून बळींचा आकडा १ लाख १९ हजार ३०३ झाला आहे.

मुंबईत गेले काही दिवस ५०० च्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारी ८६३ नवे रुग्ण आढळून आले. तसेच रोज १० पेक्षा कमी मृत्यू होत होते. त्यात बुधवारी वाढ झाली आहे. दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो ७२८ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २३ हजार ३२४ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १५,३३८ झाला आहे. मागील २४ तासांत ७११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ९१ हजार १२८ वर पोहोचली आहे.

सध्या १४ हजार ५७७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १२ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.