पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:34 PM2020-09-03T15:34:17+5:302020-09-03T15:43:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती दान केले, याचा हिशेब लावला, तर ही रक्कम तब्बल 103 कोटी रुपयांच्याही पुढे जाते. पंतप्रधान मोदींनी हे दान त्यांची बचन आणि भेटवस्तूंच्या लिलावातून आलेल्या पैशांतून केले आहे.

कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएम केअर फंडात पहिले योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले होते. या फंडात त्यांनी 2.25 लाख रुपयांचे योगदान दिले होते. पीएम केअरच्या 2019-20च्या वार्षीत ऑडिटनुसार, पहीले योगदान हे 2.25 लाख रुपयांचे होते.

पीएम केअर फंडात सुरुवातीच्या पाच दिवसांत तब्बल 3,076 कोटी रुपये जमा झाले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'पंतप्रधान मोदी जनतेच्या हितासाठी सातत्याने दान करत आले आहेत. पीएम केअर फंडात सुरुवातीची 2.25 लाख रुपयांची रक्कमही पंतप्रधान मोदींनीच दान केली होती.' यासंदर्भात माहिती मिळताच ट्विटरवर Rs 2.25 ट्रेंड व्हायला सुरुवात झाली आणि युझर्स भावनिक मेसेजही करू लागले.

पंतप्रधान झाले तेव्हाही दान केली होती संपूर्ण बचत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोडताना आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारताना आपल्या वैयक्तीक बचतीतून 21 लाख रुपये दान केले होते. त्यांनी गुजरात सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी हे पैसे दिले होते.

सुरुवातीपासून 2015पर्यंत मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015मध्ये, तोपर्यंत मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव केला होता. सूरत येथे आयोजित करण्यात आलेल्या लिलावात 8.35 कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांनी 'नमामी गंगे मिशन'साठी दिली.

मिळालेल्या स्मृतिचिन्हांचाही लिलाव - नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मिळालेल्या स्मृतिचिंन्हांचाही लिलाव केला. यातून 3.40 कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे त्यांनी नमामी गंगे योजनेसाठी दान केले.

पुरस्कारात मिळालेले 1.3 कोटी रुपयेही दान - दक्षिण कोरियात पंतप्रधान मोदी यांना सियोल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी, पुरस्कारार्थ मिळालेली सर्व रक्कम आपण नमामी गंगे योजनेसाठी दान करत आहोत, अशी घोषणा केली होती. ही रक्कर 1.3 कोटी रुपये एवढी होती.

कुंभ मेळ्यासाठी 21 लाख रुपयांचे दान - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये स्वतःच्या बचतीतील 21 लाख रुपये कुंभ मेळ्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणार्थ दाण केले होते.

मिळालेल्या पुरस्कारांचा दुसऱ्यांदा लिलाव आणि पैसे दान - पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री असताना मिळालेल्या सर्व पुरस्कारांचा लिलाव केला आणि यातून मिळालेले 89.96 कोटी रुपये कन्या केळवणी कोषात दान केले. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करण्यात आले.

आतापर्यंत 103 कोटी रुपयांचे दान - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मुलींच्या शिक्षणापासून ते गंगा स्वच्छता अभियानापर्यंत वंचित घटकांच्या कल्याणासाठी योगदान केले आहे. हे दान आतापर्यंत 103 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहे.