पवारांचं कौतुक अन् राष्ट्रवादीला टोमणा, दिल्लीतील बैठकीवर आठवलेंस्टाईल निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:18 PM2021-06-22T19:18:55+5:302021-06-22T19:36:05+5:30

या बैठकीबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावरून निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यात असल्याने गाठीभेटी घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भाजपाविरोधी पक्षांनी एकत्र घेऊन ही बैठक होत आहे.

या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकाली गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

कोणाला काय करायचं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, लोकांच्या मनात नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे, 2024 मध्येही आत्ताच्या जागांपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

या बैठकीबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावरून निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींविरोधात कितीही आघाड्या झाल्या तरी ते नंबर वनच राहातील, असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींविरोधात अशा कितीही आघाड्या तयार होऊ द्या, त्याने काहीही फरक पडणार नाही.

पंतप्रधान मोदींचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे, त्यामुळेच ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

आम्हाला शरद पवारांबद्दल आदर आहे, ते महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांनी अनेक चांगली कामेही केली आहेत. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली विरोधी पक्षांची बैठक शरद पवारांनी बोलावलीच नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. संध्याकाळी ४ वाजता पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली.