ठरलं! 1 मार्चपासून दूध 100 रुपये प्रति लिटर दराने विकणार, खाप पंचायतीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 09:28 AM2021-02-28T09:28:56+5:302021-02-28T09:51:03+5:30

panchayat decided to sell milk on petrol price : हरयाणाच्या हिसारमध्ये खाप पंचायतच्या शेतकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

इंधनाच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर हरयाणाच्या हिसारमध्ये खाप पंचायतच्या शेतकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या शेतकर्‍यांनी 1 मार्चपासून दूध प्रति लिटर 100 रुपये दराने विकण्याचा निर्णय घेतला असून भविष्यात दूध पेट्रोलच्या दराच्या समान दराने विकले जाईल.

हा मुद्दा हिसारच्या नारनौदशी संबंधित आहे, येथील देवराज धर्मशाळेतील सतरोल खाप यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मार्चपासून दुधाची किंमत 100 रुपये प्रति लिटर विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सतरोल खापचे प्रमुख रामनिवास लोहान व प्रवक्ता फूल कुमार यांनी सांगितले की, हा निर्णय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घेण्यात आला आहे.

ते म्हणाले की, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तीन महिने होऊन गेले, तरीही सरकार काहीच पाऊले उचलत नाही. यातच इंधनाचे दर वाढत आहेत. अशा परिस्थितीत सतरोल खापने डेअरी व दूध केंद्रांना शेतकरी प्रति लिटर 100 रुपये दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, गरीब लोकांना आपापसात दूध देण्यास कोणतेही बंधन नाही.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, सतरोल खाप ही एक मोठी खाप असून यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक निर्णय घेतले आहेत. माजरा पयाऊ गावात 3 मार्च रोजी सतरोल खापतर्फे युवा परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

सातरोल खापचे प्रमुख रामनिवास लोहान म्हणाले की, बैठकीनंतर दूध डेअरीत दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर, गावपातळीवर युवाशक्तीचे प्रदर्शन केले जाईल. तसेच, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास आमला संयम सुटेल आणि आम्ही लढण्यासाठी तयार आहोत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका सामान्यांना सहन करावा लागत आहे. अगदी गाड्यांच्या वाहतुकीपासून ते घराच्या किरणा मालापर्यंत सर्वच क्षेत्रांवर दरवाढीचा परिणाम जाणवून येत आहे.

इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या अंतिम उत्पादनाचा खर्च वाढणे अपेक्षित आहे.

त्यामुळे त्याचा बोजा ग्राहकांवरच पडू शकतो. कोरोनाच्या उगमापासून आतापर्यंत इंधनाच्या दरांत तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रक वाहतुकीचा खर्च वाढला आहे,

याशिवाय, मध्यमवर्गाच्या भाजीपाला, किराणा मालावरील खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. इंधनाच्या दरांना आवर घातला नाही तर मध्यमवर्गाचे आर्थिक गणित कोलमडू शकते.