Omicron Variant : भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे का? देश किती तयार आहे? सरकारने दिली अनेक प्रश्नांची उत्तरे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:25 PM2021-12-03T19:25:36+5:302021-12-03T19:34:05+5:30

Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या व्हेरिएंटला (Covid New Variant) सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात गुरुवारी (दि.03) कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमित (Omicron Infection) दोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता भारतही कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची (Omicron in India) लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या व्हेरिएंटला (Covid New Variant) सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. सरकारने लोकांना ओमायक्रॉन व्हेरिएटंबाबत घाबरू नका, असे आवाहन केले आहे.

भारतात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एक रुग्ण ६६ वर्षांचा आहे तर दुसरा ४६ वर्षांचा आहे. त्यापैकी एक दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे तर दुसरा स्थानिक डॉक्टर आहे. ओमायक्रॉन संसर्गाबाबत कोरोना टास्क फोर्सच्या सदस्याने सांगितले की, यावेळी लसीकरण, जीनोम सिक्वेन्सिंग आणि प्रवासाच्या नियमांमध्ये दक्षता याद्वारे याला सामोरे जाऊ शकते.

देशात अशी जवळपास 12 विमानतळे आहेत जिथे जास्त जोखीम असलेल्या देशांमधून उड्डाणे येत आहेत. येथून येणाऱ्या प्रवाशांची अनिवार्य चाचणी केली जात आहे. यासोबतच 'जोखीम'च्या यादीत समाविष्ट असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर कडक व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेशिवाय जगातील काही देशांमधून ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 30 हून अधिक देश या नवीन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. या व्हेरिएंटच्या संसर्गाचे प्रमाण पाहता सरकारने राज्य सरकारांना पत्रही लिहिले आहे. भारतासह इतर देशांमध्येही त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोगाच्या तीव्रतेबद्दल अद्याप काहीही स्पष्ट नाही. भारतातील लसीकरणाचा वेग आणि डेल्टा व्हेरिएंटची उच्च जोखिम लक्षात घेता, त्याची तीव्रता कमी असणे अपेक्षित आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या लसी ओमायक्रॉनवर कार्य करत नसल्याचा कोणताही पुरावा नसला तरी, स्पाइक जीनवर रिपोर्ट केलेल्या काही उत्परिवर्तनांमुळे त्यांची परिणामकारकता कमी करू शकते. दक्षिण आफ्रिकेतील डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी खुलासा केला आहे की, देशात ज्यांनी कोरोनाचे दोन्ही लसीचे डोस घेतले होते, अशा लोकांना देखील ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, ज्या लोकांना अद्याप लसीकरण केले गेले नाही अशा लोकांना जास्त धोका आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word).जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ज्या पहिल्या नमुन्यातून ओमायक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. तसेच, या कोरोनाच्या व्हायरसचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टासारखा धोकादायक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी येणे बाकी आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ या व्हाययरच्या संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. जागतिक आरोग्य संघटनेकडेही या व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती नाही. दरम्यान, या ओमायक्रॉनला चिंतेचा व्हेरिएंट म्हणून संबोधले जात असले तरी, जागतिक आरोग्य संघटने म्हटले होते की, हे आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.