भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:24 PM2020-06-15T14:24:42+5:302020-06-15T14:30:24+5:30

भारतीय क्षेत्रात पर्यावरणातील बदल नावाच्या या अहवालामध्ये ही धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे घरीच असल्याने यंदाचा उन्हाळा काहीसा सुसह्य होता. मात्र, भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगमुळे भारताचे तापमान कमालीचे वाढणार असल्याचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.

एवढेच नाही तर तापमान वाढल्याने भारत आणि उपखंडातील महापूर आणि दुष्काळाची संख्याही कमालीची वाढणार असल्याचा इशारा देण्य़ात आला आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये देशातील तापमानामध्ये मोठे बदल झाले आहेत.

भारतीय क्षेत्रात पर्यावरणातील बदल नावाच्या या अहवालामध्ये ही धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत देशातील तापमान 4.4 डिग्रीने वाढण्याचे म्हटले आहे.

एवढेच नाही सूर्याची प्रखरताही 3 ते 4 पटींनी वाढणार आहे. चक्रीवादळाची संख्या वाढणार आहे. तसेच समुद्राची उंचीही 30 सेंटीमीटरने वाढणार आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या 30 वर्षांत (1986-2015) उष्ण दिवस आणि थंडीच्या रात्रीवेळी तापमानात वाढ पहायला मिळालेली आहे. दिवसा तापमान 0.63 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. तर थंडीच्या रात्री तापमान 0.4 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे.

जर दिवसा आणि रात्रीचे तापमान असेच वाढत राहिले तर एकविसाव्या शतकाच्या शेवटी दिवसाचे तापमान 4.7 डिग्री सेल्सिअसने आणि रात्रीचे तापमान 5.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. हे तेव्हाच होणार आहे जेव्हा हरित गॅसचे उत्सर्जन रोखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी काहीच उपाय केले जाणार नाहीत.

गेल्या काही दशकांपासून भारतात पूर आणि दुष्काळ पडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. मध्य भारतात दुष्काळ जास्त पडायला लागला आहे. तर किनारपट्टी भागात, उत्तर प्रदेशमध्ये पुराचे प्रमाण वाढू लागले आहे.

पुण्यातील Indian Institute of Tropical Meteorology च्या वैज्ञानिकांनी हा अहवाल बनविला आहे. यामध्ये भारत आणि उपखंडातील वातावरणाचा अभ्यास करण्यात आला आहे.

वातावरणातील बदलाचा हा धक्कादायक अहवाल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन मंगळवारी जाहीर करणार आहेत. या अहवालात राज्य किंवा शहरांवर आधारिक कोणतेही अनुमान नाहीय. अनेक संशोधनांचा आधार घेऊन बनविण्यात आले आहे. मुंबई आणि कोलकाता सारख्या शहरांनी आणि त्यांच्या आसपासच्या परिसराने नुकताच चक्रीवादळाचा सामना केला होता.

हा अहवाल वातावरणातील बदलाबाबत संयुक्त राष्ट्रांसारखा अहवाल नाहीय. जागतिक अहवालामध्ये जगाचे आकलन केले जाते.