ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 05:34 PM2020-09-03T17:34:49+5:302020-09-03T17:43:58+5:30

देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकनेभाजपा नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती. या बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता.

फेसबुकच्या प्रवक्त्याने ईमेल पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे.

आमचे धोरण फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणे किंवा द्वेष पसरवणे याला प्रतिबंधित करते. संभाव्य उल्लंघन करणार्‍यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंह यांचे अकाऊंट फेसबुकवरून काढून टाकले आहे,असं निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं होतं की, फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात, त्यानंतर भारताच्या विरोधी पक्षांनी फेसबुक आणि सरकारचं साटेलोटे असल्याचा आरोप केला होता.

भारत हा फेसबुकसाठी सर्वात मोठे बाजार आहे, त्याचे भारतात ३० कोटी युजर्स आहेत. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, फेसबुकने भाजपाचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केले.

तेव्हापासून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस सोशल मीडिया दिग्गज कंपनीच्या कथित पक्षपातीपणाबद्दल वक्तव्य करीत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले.

त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी फेसबुक बॅनचे वृत्त निरर्थक असल्याचं म्हटलंय. मात्र, माध्यमांमधील हे वृत्त निरर्थक आहे. कारण, मी एप्रिल 2019 पासूनच माझं फेसबुक अकाऊंट वापरत नाही.

म्हणून फेसबुकने मला बॅन केलंय, असं म्हणणे निरर्थक असल्याचं स्पष्टीकरण राजासिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलंय. ऑक्टोबर 2018 मध्येच यासंदर्भात आमदार राजा सिंह यांनी सायबर क्राईम विभागाकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली होती.