भारतात येथे उभारण्यात आलंय महात्मा गांधींचं मंदिर, दररोज होते पूजा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:58 PM2021-07-24T15:58:32+5:302021-07-24T16:10:07+5:30

Mahatma Gandhi Mandir: या देशात महात्मा गांधींचं एक मंदिर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर आज जाणून घ्या त्या मंदिराविषयी.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अहिंसक मार्गाने नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी अर्थात बापूजींना ओळखत नाही अशी व्यक्ती या देशात सापडणार नाही. देशातील अनेक रस्ते, शाळा, महाविद्यालये यांना महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आहे. मात्र या देशात महात्मा गांधींचं एक मंदिर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर आज जाणून घ्या त्या मंदिराविषयी.

कर्नाटकमधील मंगळुरू येथे महात्मा गांधींचे हे खास मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज महात्माजींची पूजा होते. महात्मा गांधींचे हे मंदिर मंगळुरूमधील श्री ब्रह्म बैदरकला क्षेत्र गरोडी येथे स्थित आहे.

महात्मा गांधी यांचे अनुयायी या मंदिराला भेट देत असतात. तसेच बापूजींनी दाखवलेल्या सत्त आणि अहिंसेच्या मार्गावरून चालण्याचा संकल्प करतात.

१९४८ मध्ये येथे महात्मा गांधी यांची एक मातीची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. त्यानंतर २००६ मध्ये लोकांनी केलेल्या मागणीनंतर येथे मंदिर उभारण्यात आले. तसेच महात्मा गांधींची संगमरवरी मूर्ती स्थापित करण्यात आली. येथे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. तसेच महात्मा गांधी यांची आरतीही केली जाते.

गांधी जयंती दिवशी येथील मंदिरामध्ये विशेष पूजेचे आयोजन होते. तसेच फळ आणि मिठाईसोबत बापूजींना ब्लॅक कॉफीचा प्रसाद अर्पण केला जातो. तसेच हा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो.

महात्मा गांधींचे अजून एक मंदिर हे ओदिशामधील संबलपूर जिल्ह्यातील भटारा गावात आहे. या मंदिरामध्ये महात्मा गांधींची सहा फूट उंचीची तांब्याची मूर्ती स्थापित केलेली आहे.