३० जानेवारीचा तो दिवस, बापूंवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना काय म्हणाला होता गोडसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 10:56 AM2021-01-30T10:56:02+5:302021-01-30T11:06:30+5:30

प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या.

आज मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांची पुण्यतिथि आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीतील बिडला भवनमध्ये गांधीजींची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर एकापाठी एक तीन गोळ्या झाडल्या होत्या. गांधीजींनी जागेवर अखेरचा श्वास घेतला. प्रत्येक पिढीला गांधीजींबद्दल विस्ताराने जाणून घ्यायचं आहे. अखेर ३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी नेमकं काय झालं होतं की, नथ्थूराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या.

३० जानेवारी १९४८ च्या सायंकाळी साधारण ४ वाजले असतील. त्या दिवशी गांधीजींनी सरदार पटेल यांना चर्चा करण्यासाठी ४ वाजता बोलवलं होतं. पटेल त्यांची मुलगी मणिबेन यांच्यासोबत ठरलेल्या वेळेवर तिथे पोहोचले होते. गांधीजी प्रार्थना सभेनंतर त्यांच्याशी बोलणार होते त्यामुळे त्यांना तिथे थांबण्यास सांगितले. पण नियतीला हे मान्य नव्हतं. पटेल यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर प्रार्थनेसाठी जाताना गोडसेने गांधीजींववर गोळ्या झाडल्या.

३० जानेवारीला नेहमीप्रमाणे बिडला भवनमध्ये सायंकाळी ५ वाजता प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. गांधीजी जेव्हाही दिल्लीत असायचे ते या सभेला जाण्यास कधीही विसरत नव्हते. ३० जानेवारी १९४८ ला सायंकाळचे ५ वाजले होते. गांधीजी सरदार पटेल यांच्यासोबत चर्चा करण्यात बिझी होते. अशात त्यांची नजर घड्याळावर गेली आणि त्यांच्या लक्षात आलं की, प्रार्थनेसाठी उशीर होत आहे.

बैठक पूर्ण झाल्यावर बापू आभा आणि मनु यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रार्थना सभेत सामिल होण्यासाठी मंचाकडे पुढे गेले. तेव्हाच अचानक त्यांच्यासमोर नथ्थूराम गोडसे आला. गोडसेने बापूंना समोर पाहिल्यावर त्याने हात जोडले आणि म्हणाला 'नमस्ते बापू!. तेव्हा बापूसोबत चालत असलेल्या मनु म्हणाल्या होत्या की, भाऊ, समोरून बाजूला हो. बापूंना जाऊ दे...आधीच उशीर झाला आहे.

सायंकाळचे ५.१७ मिनिटे झाली होती. आधी गोडसेने मनु यांना अचानक धक्का दिला आणि लपवलेली पिस्तुल काढून त्याने बापूंवर एकापाठी एक तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या बापूंच्या शरीरातून बाहेर पडल्या तर एक गोळी आतच अडकून राहिली. गांधीजी तिथेच खाली पडले.

गांधीजींची हत्या केल्यानंतर गोडसेने आपला गुन्हा कबूल केला होता. तो म्हणाला होता की, ही हत्या केवळ त्याने केली आहे. नथ्थूरामने दुसरा आरोपी म्हणून आपला लहान भाऊ गोपाल गोडसेचं नाव घेतलं होतं. गोडसे आपला गुन्हा कबूल करताना म्हणाला होता की, 'शुक्रवारी सायंकाळी ४.५० मिनिटांनी बिडला भवनच्या गेटवर पोहोचलो. मी चार पाच लोकांच्या घोळक्यात घुसून सिक्युरिटीला चकमा देत आत शिरलो. मी गर्दीत स्वत:ला लपवलं होतं. जेणेकरून माझ्यावर कुणाला संशय येऊ नये'.

गोडसे म्हणाला होता की, 'सायंकाळी ५.१० वाजता मी गांधीजींना त्यांच्या खोलीतून निघून प्रार्थना सभेला जाताना पाहिलं. गांधीजींच्या दोन्ही बाजूला दोन मुली होत्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते चालत होते. मी गांधीजींना समोर येताना बघून आधी त्यांच्या महान कामासाठी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि दोन्ही मुलींना वेगळं करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मी दोनच गोळ्या झाडणार होतो. मात्र तिसरीही चालली आणि गांधीजी तिथेच पडले'.

अटक केल्यावर गोडसे म्हणाला होता की, 'जेव्हा मी एकापाठी एक तीन गोळ्या झाडल्या तेव्हा गांधीजींजवळ असलेले लोक दूर पळाले. मी सरेंडर करण्यासाठी दोन्ही हात वर केले. त्यानंतर कुणीही हिंमत करून माझ्याजवळ येत नव्हतं. पोलिसही दुरूनच बघत होते. मी स्वत: पोलीस पोलीस ओरडलो. साधारण ५-६ मिनिटांनंतर एक व्यक्ती माझ्याजवळ आली. नंतर माझ्यासमोर गर्दी जमा झाली आणि लोक मला मारू लागले होते'.

सायंकाळी ६ वाजतानंतर महात्मा गांधींच्या हत्येची बातमी आगीसारखी पसरली. बिडला हाऊसमध्येच गांधीजींचं पार्थिव झाकून ठेवण्यात आलं. तेव्हाच त्यांचा लहान मुलगा देवदास गांधी तिथे पोहोचले आणि त्यांनी गांधीजींच्या पार्थिवावरील कपडा दूर केला. त्यांचं म्हणणं होतं की, अहिंसेच्या पुजाऱ्यासोबत झालेल्या हिंसेला जगाने बघावं.

गांधीजींच्या हत्येची एफआयआर त्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारीला दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. एफआयआरची कॉपी ऊर्दूमध्ये लिहिली होती. ज्यात संपूर्ण घटनेचा उल्लेख होता. दिल्लीच्या तुघलक रोडच्या रेकॉर्ड रूममध्ये एफआयआरची ती पाने सांभाळून ठेवली आहे.