चहा विक्रेत्याच्या लेकीची कौतुकास्पद कामगिरी, फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:12 PM2020-06-22T12:12:41+5:302020-06-22T12:25:43+5:30

'माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप कमी क्षण आले आहेत. मात्र कधीही हार न मानणाऱ्या माझ्या मुलीने आज माझ्या कष्टाचं चीज केलं आहे. तिचा खूप अभिमान आहे' असं आंचल यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. एका तरुणीने हे सिद्ध करून दाखवलं आहे. चहा विक्रेत्याच्या लेकीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील चहा विक्रेते सुरेश गंगवाल यांची मुलगी आंचल गंगवाल फ्लाईंग ऑफिसर झाली आहे. आंचल गंगवाल यांना 123 कॅडेटसह हवाई दलात नियुक्त केले गेले.

हैद्राबादमधील एअरफोर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमझील एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्यासमोर आंचल गंगवाल असताना तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

सुरेश यांना आपल्या लेकीचा अभिमान आहे. फादर्स डे चं याहून सुंदर गिफ्ट असूच शकतं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे यंदा पालकांना पासिंग आउट परेडमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.

'माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप कमी क्षण आले आहेत. मात्र कधीही हार न मानणाऱ्या माझ्या मुलीने आज माझ्या कष्टाचं चीज केलं आहे. तिचा खूप अभिमान आहे' असं आंचल यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

संकटाना घाबरायचं नाही हे वडिलांनी शिकवलं आहे. जीवनात अनेक समस्या येतात मात्र या सर्व आव्हानांचा सामना करण्याची ताकद असली पाहिजे हे वडिलांकडून शिकली अशा शब्दांत आंचल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज मी जे काही आहे ते माझ्या पालकांच्या मेहनतीमुळे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच आंचल यांनी आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय पालकांना दिलं आहे.

एअरफोर्स अधिकारी होण्याची इच्छा असल्याने आंचल यांनी पोलीस उपनिरीक्षक आणि कामगार निरीक्षकाची नोकरी सोडली आहे.

आंचल यांनी डिफेन्स सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना थोडी चिंता होती. मात्र त्यांनी आपल्या मुलीला थांबवलं नाही. नेहमी प्रोत्साहन दिलं.

आई-बाबा हे नेहमीच माझ्या जीवनातील आधारस्तंभ आहेत. मातृभूमीची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे असं देखील आंचल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read in English