लोकसभा अध्यक्षांचा विक्रम अबाधित, पुन्हा 'संसदेत नो एंट्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 10:53 PM2019-05-03T22:53:44+5:302019-05-03T22:58:40+5:30

सोमनात चॅटर्जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. २००४ मध्ये १४व्या लोकसभेच्या अधिक्षपदी ते विराजमान झाले होते. पश्चिम बंगालमधील बोलपूर मतदार संघातून चॅटर्जी खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान मनमोहन सिंग यांच्या सरकारविरुद्ध डाव्यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी सीपीएमकडून चॅटर्जी यांच्यावर पद सोडून काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी दबाव आणला गेला होता. मात्र त्यांनी पक्षाचा आदेश पाळण्यास नकार दिला होता. त्यामुळे सीपीएम पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर चॅटर्जी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णविराम दिला. तसेच एकही निवडणूक लढवली नाही.

मीरा कुमार जिंकल्यास मोडणार पायंडा मागील २० वर्षात लोकसभा अध्यक्षपद भूषविणाऱ्या एकाही नेत्याला संसदेत परतता आले नाही. मात्र सासाराममधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मीरा कुमार विजयी झाल्यास मागील २० वर्षांचा पायंडा मोडणार आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

सुमित्रा महाजन सुमित्रा महाजन या १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष आहेत. मागील ६७ वर्षांच्या इतिहासात महिला अध्यक्ष ठरणार महाजन दुसऱ्या आहेत. मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या महाजन मागील आठ लोकसभा निवडणुकीत इंदोरमधून निवडून आलेल्या आहेत. जून २०१४ मध्ये त्यांना लोकसभा अध्यक्ष कऱण्यात आले. मात्र २०१९ लोकसभा निवडणुकीत महाजन यांना तिकीट देण्यात भाजपला अडचणी आल्या. अखेर महाजन यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ठरलेल्या महाजन यांना पुन्हा संसदेत जाता येणार नाही, हे स्पष्टच आहे.

शिवसेना नेते मनोहर जोशी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. तसेच ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. १९९९ मधील लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून जोशी लोकसभेत दाखल झाले होते. एक विमान दुर्घटनेत लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांच्या अपघाती निधनानंतर सर्वसंमतीने जोशी यांना लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. मात्र २००४ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

काँग्रेस नेत्या मीरा कुमार पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आहेत. तसेच पहिल्या दलित महिला देखील आहेत. २००९ मध्ये बिहारमधील सासाराम येथून निवडून मीरा कुमार लोकसभेत दाखल झाल्या होत्या. त्यांनी संपूर्ण पाच वर्षे लोकसभा अध्यक्षपद भूषविले. मात्र २०१४ मध्ये भाजपचे छेदी पासवान यांच्याविरुद्ध मीरा कुमार यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना परत लोकसभेत जाता आले नाही. मीरा कुमार आता पुन्हा एकदा सासाराममधून निवडणुकीच्या रिंगणात असून यावेळी त्यांना विजयाची खात्री आहे.