Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 11:54 AM2020-05-18T11:54:35+5:302020-05-18T12:35:11+5:30

CoronaVirus Lockdown काही जणांनी कृषी कर्ज, काहींनी वाहन कर्ज काहींनी गृह तर काहींनी व्यक्तीगत कर्ज उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्चपासून कर्जदारांना ईएमआय दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा देखील तोट्याचा ठरत आहे.

लॉकडाऊन वाढल्याने देशातील लाखो लोकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास प्रत्येकाचे काही ना काही कर्ज सुरु आहे. यामुळे हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत बरेचजण आहेत.

काही जणांनी कृषी कर्ज, काहींनी वाहन कर्ज काहींनी गृह तर काहींनी व्यक्तीगत कर्ज उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्चपासून कर्जदारांना ईएमआय दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा देखील तोट्याचा ठरत आहे.

जो कर्जदार लॉकडाऊन काळात कर्ज फेडू शकत नाही त्याला डिफॉल्टर लिस्टमध्ये न टाकण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत. अशा संकटाच्या काळात मिझोराममध्ये एक अज्ञात व्यक्ती चार कर्जदारांसाठी फरिश्ता बनून आला आहे.

या व्यक्तीने चार जणांची मदत केली. त्याने या लोकांचे जवळपास १० लाख रुपयांचे कर्ज फेडले आहे.

मिझोरामची राजधानी आयझोलची ही घटना आहे. इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार या अज्ञात व्यक्तीने पैसे भरताना बँकेत सांगितले की, माझी ओळख समोर येता नये. एसबीआयच्या शाखेतील काही लोकच या व्यक्तीला ओळखतात.

या व्यक्तीने एकूण 9,96,365 रुपयांचे कर्ज फेडले आहे. या चार कर्जदारांमध्ये तीन महिला आहेत. एसबीआयच्या ब्रँच मॅनेजर शेरील वांचोंग यांनी सांगितले की, बँकेतील तीन कर्मचारीच या व्यक्तीला ओळखतात. त्याने सांगितले की, तो काही लोकांची मदत करू इच्छितो. तसेच त्याने आपल्याकडे १० लाख रुपये असल्याचे सांगितले.

हे पैसे भरण्यासाठी त्याने एकच अट ठेवली होती. ती म्हणजे लॉकडाऊनमुळे खरोखरच कोणी कर्ज फेडू शकत नसेल अशा व्यक्तीलाच मदत करायची त्याची इच्छा होती. तसेच ज्यांची मालमत्ता कर्जासाठी तारण होती.

मग बँकेमध्ये शोध सुरु झाला, योग्य कर्जदारांचा. बँकेने त्याच्यासमोर चार जणांची नावे ठेवली, ज्यांच्या कर्जाची रक्कम एकूण १० लाख होत होती. पुढच्या दिवशी या चारही कर्जदारांना शाखेमध्ये बोलावण्यात आले. मात्र, काय घडणार आहे याची कल्पना दिली नव्हती.

त्याच्या नाव न सांगण्याच्या अटीनुसार बँकेने या चार लोकांच्या कर्ज प्रकरणावर कार्यवाही केली. आणि कर्जमुक्त केले.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या आधीही असे प्रकार घडले आहेत. एका पोल्ट्री व्यावसायिकाचे 2,46,631 कर्ज असेच एका व्यक्तीने भरले होते. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो चार लोकांचे कर्ज भरणारा फरिश्ता होता.