Lemon Inflation: देशभरात लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 06:34 PM2022-04-14T18:34:48+5:302022-04-14T18:39:41+5:30

Lemon Inflation: देशभरात लिंबाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. अनेक ठिकाणी लिंबाच्या किमती 240-400 रुपयांपर्यंत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Lemon Price Rise: सध्या देशातील बहुतांश शहरांमध्ये भाज्यांचे दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या सगळ्यात लिंबाच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठलाय. लिंबाचे दर 350 ते 400 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. लिंबाच्या वाढलेल्या किमतीचा फटका केवळ ग्राहकांनाच नाही तर दुकानदारांनाही बसला आहे. मात्र असे काय झाले की, लिंबाचे भाव अचानक गगनाला भिडू लागले.

देशभरात लिंबाचा तुटवडा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील ज्या भागात लिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, त्या भागाला कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.

उष्णतेमुळे लिंबू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि उष्णतेमुळे लिंबाची फळे सुरुवातीच्या काळात म्हणजेच फुले असताना गळून पडत आहेत.

गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागात उकाडा वाढत आहे. उष्णतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक शुल्कात वाढ झाली आहे. एकीकडे लिंबाचा तुटवडा आणि दुसरीकडे वाढलेले वाहतूक शुल्क, या दोन्ही गोष्टी महागाईला कारणीभूत आहेत.

यावेळी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लिंबाच्या भाववाढीसह कमी पीक येण्यास डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीतही 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.

लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत सोहळ्यांसाठी लिंबाची मागणी आणखी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे लिंबाच्या दरातही वाढ होताना दिसत आहे.

उन्हाळ्यात उसाच्या रसापासून लिंबूपाणीपर्यंत सर्वत्र लिंबाची गरज असते. अशा स्थितीत लिंबाचे भाव वाढत चालल्याचे दिसत आहे.

यावेळी नवरात्र आणि रमजानचा महिनाही सुरू आहे. उपवासातही लिंबाचा वापर जास्त केला जातो. सध्या उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने दर गगनाला भिडत आहेत.

गुजरातमध्ये चक्रीवादळानंतरच्या प्रभावामुळेही लिंबू उत्पादनात घट झाली असून त्यामुळे भावात वाढ होत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.