जगन्नाथ मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, संबित पात्रांनी घातले लोटांगण

By महेश गलांडे | Published: January 3, 2021 10:15 AM2021-01-03T10:15:05+5:302021-01-03T10:34:06+5:30

जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आजपासून भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना, भाविकांना आजपासून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

भाविकांना तब्बल 9 महिन्यांनंतर मंदरिाचे दर्शन घेण्याचा लाभ मिळाला, त्यानिमित्त भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी जगन्नाथ मंदिरात जाऊन प्रभूंचे दर्शन घेतले.

भारतभर आपल्याला विविध देवतांची हजारो मंदिरे आढळून येतात. जम्मू काश्मीरमधील माता वैष्णो देवीपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरपर्यंत असलेल्या मंदिरांच्या प्रतिवर्षीच्या यात्रा म्हणजे भक्तांसाठी, भाविकांसाठी, उपासकांसाठी पर्वणी असते.

भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. हे निव्वळ भारतातच नाही, तर परदेशी भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिराची वास्तू रचना इतकी भव्य आहे की, वास्तू शास्त्रज्ञ लांबून लांबून या विषयी शोध घेण्यासाठी येतात.

या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते.

भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करत गुंडिचा मंदिर येथे जातात. कोरोना संकटामुळे यंदाची यात्रा होईल की नाही, याबाबत अनिश्चितता होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करत जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली. मात्र, मोजके जण वगळता अन्य कोणताही भाविक रथयात्रेत सहभागी होणार नाही, असाही आदेश दिला. गर्दी टाळण्यासाठी जगन्नाथ रथयात्रा मार्गांवर सर्व ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. याचे थेट प्रक्षेपण केले.

कोरोनामुळे गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेले हे जगन्नाथ पुरीचे मंदिर गेल्या महिन्यात 23 तारखेला सुरू करण्यात आले. मात्र, केवळ मंदिरातील सेवकांसाठी ते सुरू झाले होते.

3 जानेवारी म्हणजेच आजपासून सर्व भाविक भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी, लोटांगणही घातले. मंदिर सुरू झाल्याचा सर्वांना आनंद असल्याचं ते म्हणाले.

जगन्नाथ यात्रेला देश-विदेशातून सुमारे ८ लाख भाविक उस्फुर्तपणे सहभागी होत असतात. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते.