भारताचा जबरदस्त प्लॅन! ३८ दहशतवाद्यांची यादी तयार, पाकिस्तानचं षडयंत्र हाणून पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 05:36 PM2021-11-23T17:36:28+5:302021-11-23T17:42:54+5:30

India vs Pakistan: काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं आहे. लष्कराच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवादी कंठस्नान झाले

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सीमा सुरक्षा जवानांनी सातत्याने कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आहे. भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे लाइन ऑफ कंट्रोल(LOC) आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर कठोर कारवाईमुळे दहशतवादी भारतात घुसण्यात अयशस्वी होत आहेत.

जेव्हाही दहशतवादी लाइन ऑफ कंट्रोलमधून देशात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले जातात. भारतीय जवानांच्या या कामगिरीमुळे सध्या पाकिस्तानची अवस्था बिखरल्यासारखी झाली आहे.

पाकिस्तानी लष्कराचे जनरल बाजवा यांची फौज आणि आयएसआय(ISI) काश्मीर खोऱ्यात घटत असलेल्या दहशतवादी संख्येमुळे त्रस्त झाले आहेत. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, पाकिस्तानींनी भारतात घुसखोरी करण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे.

या प्लॅननुसार, दहशतवादी आता भारत-पाकिस्तानी सीमा आणि LOC वर बनलेल्या नदी-नाल्यांची रेकी करत आहेत. घुसखोरांना पाण्याच्या आतमधूनच भारताच्या सीमेत पाठवण्याची योजना पाकिस्ताननं आखली आहे. याबाबत मागील काही महिन्यांपासून ट्रेनिंग सुरु असल्याचंही माहिती समोर येत आहे.

पाकिस्तानी नेव्ही आणि लष्कर यांच्यासोबत दहशतवाद्यांच्या गटाचे वॉटर कॉम्बेट ट्रेनिंग झाले आहे. म्हणजे समुद्र अथवा नदी किंवा छोटे मोठे नाले यामाध्यमातून घुसखोरांना भारतात पाठवून दहशतवादी हल्ल्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातही १० दहशतवादी पाकिस्तान नेव्हीच्या माध्यमातून मुंबईत दाखल झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय नेव्ही आणि इंडियन कोस्ट गार्ड अधिक सतर्क झाले आहेत. समुद्री मार्गावर जवानांकडून लक्ष ठेवले जात आहे.

आता पुन्हा याच रणनीतीच्या माध्यमातून दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवण्याचा प्लॅन पाकिस्तान आखत आहे. LOC जवळील कृष्णा खोरे आणि पूंछ येथील परिसरात असलेल्या नाल्यातून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

ISI नं या दहशतवादी गटाला वॉटर कॉम्बेट ट्रेनिंग दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, LOC जवळ जम्मू काश्मीरमध्ये १३ छोटे नाले आणि नद्या आहेत. जिथून दहशतवादी घुसखोरीच्या तयारी असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच BSF आणि अन्य सुरक्षा जवानांनी याठिकाणी गस्त वाढवली आहे.

भारतात घुसखोरी करत काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचा इरादा दहशतवाद्यांचा आहे. सुरक्षा दलांवर हल्ले असो वा सर्वसामान्य नागरिकांना निशाणा बनवणं. प्लॅनिंगपासून दहशतवादी संघटनांमध्ये काश्मीरच्या युवकांना सामावून घेण्याचं षडयंत्र सीमेपलीकडे रचलं जातं.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार आहे. यात ३८ दहशतवादी काश्मीरमध्ये हजर आहेत. यातील २७ लश्करचे तर ११ दहशतवादी जैश ए मोहम्मदचे आहेत. श्रीनगर ४, कुलगाम ३, पुलवामा १० आणि बारामुला १० अशा विविध ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती आहे.