Indian Railways hikes fare: रेल्वे प्रवाशांना मोठा झटका, प्रवासी भाड्यात वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 10:59 AM2021-02-25T10:59:05+5:302021-02-25T11:53:06+5:30

Indian Railways hikes fare: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वेकडून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : Indian Railways hikes fare: भारतीय रेल्वेने पॅसेन्जर गाड्यांचे भाडे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे (short distance trains) भाडे वाढविले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वेकडून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे. कारण, रेल्वे गाड्यांमध्ये जास्त लोकांनी गर्दी करू नये. रेल्वेकडून वाढविण्यात आलेल्या भाड्याचा परिणाम 30-40 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पडणार आहे.

भारतीय रेल्वेने सांगितले की, वाढविण्यात आलेल्या भाड्याचा परिणाम फक्त 3 टक्के रेल्वे गाड्यांवर होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप असून काही राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे.

अशा परिस्थितीत भाडेवाढ केल्यामुळे रेल्वे गाड्यांमधून होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होऊ शकते. याचबरोबर, आधीपासूनच प्रवासात मोठे नुकसान होत आहे. तिकिटांवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, वाढीव किंमती समान अंतरासाठी धावणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्याच्या आधारे ठरविण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता प्रवाशांना अगदी कमी प्रवासासाठीही मेल / एक्स्प्रेसच्या समान भाडे द्यावे लागेल.

अशा परिस्थितीत 30 ते 40 किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक भाडे द्यावे लागणार आहे. दरम्यान, कोरोना व्हायरचा प्रसार थांबविण्यासाठी भारतीय रेल्वेला 22 मार्च 2020 रोजी गाड्यांचे परिचालन थांबवावे लागले होते.

भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. कोरोना संकट काळात भारतीय रेल्वेने लॉकडाऊन होण्याच्या पूर्वीच्या तुलनेत जवळपास 65 टक्के मेल / एक्स्प्रेस गाड्या आणि 90 टक्क्यांहून अधिक उपनगरी सेवेत असणाऱ्या गाड्यांचे परिचालन केले आहे.

सध्या एकूण 1250 मेल / एक्स्प्रेस, 5350 उपनगरीय रेल्वे सेवा आणि 326 हून अधिक प्रवासी गाड्या दररोज धावतात आणि कमी अंतराच्या प्रवासी गाड्यांची संख्या एकूण गाड्यांच्या 3 टक्क्यांहून कमी आहे.

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. अनेक प्रवासी कमी असूनही लोकांच्या हितासाठी अनेक गाड्या चालविल्या जात आहेत.

दरम्यान, देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत आहे. गेल्या काहीदिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून कडक निर्बंध, संचारबंदी करण्यात येत आहे.