फर्स्ट क्लास AC पासून ते जनरलपर्यंत, रेल्वेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे डबे असतात माहित्येय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:52 PM2021-03-19T16:52:16+5:302021-03-19T16:59:55+5:30

रेल्वेत एसी कोचपासून ते जनरल डब्ब्यांपर्यंत असे नेमके किती आणि कोणकोणत्या प्रकारचे डब्बे असतात याची माहिती आपण जाणून घेऊयात...

दैनंदिन जीवनात आपण अनेकदा रेल्वेनं प्रवास करतो. लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या डब्यांवर 2S, 3S आणि CC, EC असं लिहिलेलं आपल्याला अनेकदा दिसून येतं. या अक्षरांचा अर्थ काय आहे? आणि रेल्वेमध्ये एसी डब्ब्यांपासून ते जनरल डब्ब्यांपर्यंत नेमके किती प्रकारचे डब्बे असतात माहित्येय का? याचीच माहिती आपण घेणार आहोत.

AC FIRST CLASS: एसी फर्स्ट क्लास रेल्वे डब्ब्यातील प्रवास विमानातील प्रवासा इतकाच महागडा असतो. फुल AC फर्स्ट क्लास कोचमध्ये ८ केबिन असतात तर हाफ AC फर्स्ट क्लास कोचमध्ये ३ केबिन असतात. यात तुम्हाला वैयक्तिक खोलीसारखी राजेशाही सुविधा देखील मिळतात.

2A AC टू-टियर ही एअर कंडिशन स्लीपर कोच सुविधा आहे. या कोचमध्ये एसीच्या सुविधेसोबतच खिडक्यांना आकर्षक पडदे आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

3A - AC Three-Tier: ही देखील एअर कंडीशन कोच असून यात ६४ बर्थ असतात. पण यात आसन व्यवस्था 2A AC कोच सारख्याच सामान्य असतात.

First Class: रेल्वेचा फर्स्ट क्लास डब्बा 1 AC सारखाच असतो पण यात एयर कंडीशन आणि स्लीपरसारखी सुविधा नसते. याशिवाय या डब्ब्यातील आसन व्यवस्था लहान असते.

3E AC Three-Tier (इकोनॉमी): रेल्वेचे हे कोच पूर्णपणे एअर कंडीशन सुविधेचे असतात. यात स्लीपिंग बर्थ देखील असतात.

EC- (एग्झिक्यूटिव्ह चेयर कार): रेल्वेच्या EC कोचमध्ये AC (एअर कंडिशन) सुविधेसह बसण्याची आलिशान व्यवस्था असते. आसन व्यवस्था सुटसुटीत आणि मर्यादित असल्यानं आरामदायी प्रवास करता येतो. एका रांगेत केवळ चार आसनं या कोचमध्ये असतात.

CC AC चेअर कार: रेल्वेचे या कोचमध्येही खुर्च्यांची व्यवस्था असते. पण यात एका रांगेत पाच आसनांची व्यवस्था असते. रेल्वेच्या या कोचला एसी डबल डेक सीटर नावानंही ओळखलं जातं.

SL (स्लीपर क्लास): रेल्वेचे हे सर्वसाधारण कोच असतात. यात जास्तीत जास्त लोक प्रवास करतात. यात एका डब्ब्यात ७२ प्रवाशांच्या आसनाची व्यवस्था असते. यात एसी व इतर सुविधा नसतात.

2S (सेकंड सीटर): रेल्वेच्या सेकंड सीटर कोचची व्यवस्था CC (चेयर कार) सारखीच असते. पण यात एसीची सुविधा नसते. या कोचला नॉन एसी डबल डेक सीटरसुद्धा म्हटलं जातं.

UR/GEN (जनरल कोच): जनरल कोच हे सर्वात स्वस्त प्रवासासाठी ओळखले जातात. रेल्वेच्या या डब्यांमध्ये खूप गर्दी असते. या डब्ब्यांमध्ये आसनाचं आरक्षण करता येत नाही. जनरल डब्ब्यांसाठीचं तिकीट २४ तासांच्या आत संबंधित रुटवरुन जाणाऱ्या कोणत्याही रेल्वेसाठी वैध असतं.