शत्रुत्वापेक्षा माणुसकी मोठी; भारतीय जवान धावले चिनी नागरिकांसाठी, १७५०० फुटांवरून सुखरुप सुटका

By नामदेव भोर | Published: September 5, 2020 03:07 PM2020-09-05T15:07:05+5:302020-09-05T15:11:52+5:30

गेल्या काही महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या कालावधीत चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. चिनी सैन्याचे प्रयत्न भारतीय जवान हाणून पाडत आहेत.

पूर्व लडाखमधील तणाव निवळण्याची चिन्हं दिसत नसल्यानं भारतानं परिसरातील फौजफाटा वाढवला आहे. पँगाँग परिसरातल्या अतिशय मोक्याच्या जागांवर जवानांनी वर्चस्व प्राप्त केलं आहे.

एका बाजूला चिनी घुसखोरी रोखण्यासाठी प्राणांची बाजी लावण्यासही मागेपुढे न पाहणारे जवान दुसऱ्या बाजूला चिनी नागरिकांची संकटातून सुटका करण्यासाठीही धावून जात आहेत.

शत्रुत्वापेक्षा माणुसकी मोठी असते, याचा प्रत्यय चीनच्या तीन नागरिकांना आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये तब्बल १७५०० फुटांवरून अडकलेल्या चिनी नागरिकांसाठी भारतीय जवान अक्षरश: देवदूत ठरले.

३ सप्टेंबरला घडलेल्या घटनेचे फोटो नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय जवानांनी चिनी नागरिकांना ऑक्सिजन, अन्न आणि गरम कपडे पुरवले.

भारतीय जवानांनी चिनी नागरिकांची सुखरुप सुटका केली. रस्ता चुकलेल्या चिनी नागरिकांना लष्कराच्या जवानांनी योग्य रस्ता दाखवून त्यांना मोलाचं सहकार्य केलं.

एका बाजूला चीन अरुणाचल प्रदेशमधील काही जणांचं अपहरण करत असताना भारतीय जवानांनी चिनी नागरिकांना मदत केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सर्वत्र भारतीय जवानांचं कौतुक केलं जात आहे.

सीमेवरील तणावाचा सामना करताना माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या भारतीय जवानांच्या कार्याचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे.

सीमेवर तणाव वाढला असताना, चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न सुरू असताना आणि अशा परिस्थितीत त्याच देशाच्या नागरिकांना भारतीय सैन्यानं मदत केली. भारतीय जवानांची ही कृती नक्कीच अभिमानास्पद आहे.

Read in English